अक्षय मंगवडे 'अभयदादा केसरी' चा मानकरी; सृष्टी भोसलेने पटकावला महिला केसरीचा किताब
उपविजेतेपदावर प्रमोद सुळ आणि प्रतीक्षा बागडी यांना मानावे लागले समाधान
क्रांती न्यूज प्रतिनिधी- विशाल माने
वरकुटे मलवडी -
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे २० आणि २१ मे रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य राज्यस्तरीय 'अभयदादा केसरी' कुस्ती स्पर्धा अत्यंत थाटामाटात पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात कुमार महाराष्ट्र केसरी अक्षय मंगवडे याने, तर महिला गटात शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले हिने आपापल्या गटात अजिंक्यपद मिळवून 'अभयदादा केसरी'चा किताब पटकावला.
अक्षय मंगवडेला 'बुलेट' आणि मानाची चांदीची गदा
पुरुष ओपन गटातील अंतिम लढत राम सारंग यांचा पट्टा कुमार महाराष्ट्र केसरी अक्षय मंगवडे (पुणे) आणि अस्लम काझी यांचा पट्टा प्रमोद सुळ (सोलापूर) यांच्यात झाली. या अटीतटीच्या आणि रोमहर्षक लढतीने कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अखेर अक्षय मंगवडे याने 'घुटना' डावावर प्रमोद सुळ याला चितपट करत 'अभयदादा केसरी' किताबावर आपले नाव कोरले. विजेता अक्षय याला पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यातर्फे चांदीची मानाची गदा आणि बुलेट मोटरसायकल देऊन गौरविण्यात आले. उपविजेता ठरलेल्या प्रमोद सुळ याला माजी नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या वतीने चांदीची गदा आणि स्प्लेंडर मोटरसायकल देण्यात आली.
या कुस्तीचे पंच म्हणून सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष संदीप मांडवे आणि एनआयएस कोच अमोल साठे यांनी काम पाहिले. तसेच, तिसऱ्या पारितोषिकासाठी झालेल्या लढतीत साताऱ्याच्या अजित सय्यद याने खवसपूरच्या विक्रम भोसलेवर मात करत ४१,००० रुपयांचे इनाम जिंकले.
महिला गटात सृष्टी भोसलेचा धक्कादायक विजय
महिला ओपन गटात कातरखटावचे माजी सरपंच तानाजीशेठ बागल यांच्यातर्फे चांदीची गदा आणि स्कुटी मोटरसायकल असे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले होते. या लढतीत शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले (कोल्हापूर) आणि पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी यांच्यात चुरस पाहायला मिळाली. सृष्टी भोसलेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 'घुटना' डावावर प्रतीक्षाला पराभूत केले आणि 'अभयदादा महिला केसरी'चा बहुमान मिळवला. उपविजेत्या प्रतीक्षा बागडीला डॉ. रोहन गोडसे यांच्याकडून ३१,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी वेदिका शासने (कोल्हापूर) हिने वेदांतिका पवारवर मात करत १५,००० रुपयांचे पारितोषिक पटकावले.
पैलवानांना मासिक मानधन आणि आरोग्य विमा
अभयसिंह जगताप कुस्ती कमिटीने खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार विजेत्या पैलवानांना वर्षभरासाठी खालीलप्रमाणे मासिक मानधन दिले जाणार आहे:
१४ वर्षे वयोगट: प्रथम क्रमांक - ₹२,००० मासिक मानधन (द्वितीय क्रमांकास ₹४,००० रोख पारितोषिक)
१७ वर्षे वयोगट (४५, ५०, ५५ किलो): प्रथम क्रमांक - ₹२,५०० मासिक मानधन (द्वितीय क्रमांकास ₹५,००० रोख पारितोषिक)
वरिष्ठ गट (६० किलो): प्रथम क्रमांक - ₹३,००० मासिक मानधन
वरिष्ठ गट (६५ किलो): प्रथम क्रमांक - ₹४,००० मासिक मानधन
वरिष्ठ गट (७५ किलो): प्रथम क्रमांक - ₹५,००० मासिक मानधन
वरिष्ठ गट (८५ किलो): प्रथम क्रमांक - ₹६,००० मासिक मानधन
विशेष निर्णय: या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी पैलवानांचा 'आरोग्य विमा' उतरवण्याचा कौतुकास्पद निर्णय अभयसिंह जगताप कुस्ती कमिटीने घेतला आहे.
मान्यवरांची मांदियाळी
या भव्य कुस्ती मैदानाला माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पिंटू दादा मांडवे, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, हिंद केसरी महेंद्र गायकवाड, सांगली जि.प. बांधकाम सभापती पृथ्वीराज तानाजी पाटील, माजी संचालक अर्जुनराव खाडे, प्रा. सदाशिव खाडे, महेश वाघ, श्रीराम माने पाटील, सागर पोळ, पृथ्वीराज राजेमाने यांच्यासह क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशिकांत शिंदे आणि संदीप मांडवे यांनी आयोजक अभयसिंह जगताप यांच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.