विठलापूर/कौठळी (क्रांती न्यूज प्रतिनिधी):
आटपाडी तालुक्यातील विटलापूर, कौठळी आणि सांगोला तालुक्यातील खवासपूर व लोटेवाडी परिसरात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध डावलून प्रशासकीय संरक्षणात वाळू उत्खनन सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या वाळू उपशामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असतानाही, एका बड्या राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे प्रशासन मूग गिळून बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
लोटेवाडी आणि खवासपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी नदीपात्राच्या लगत आहेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे भूजल पातळी खालावण्याची भीती व्यक्त होत असून, ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आणि जमिनीच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वीच उपसा करण्यास नकार दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाळू ठेकेदार हा एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या जवळचा असून, त्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा 'मॅनेज' केल्याची चर्चा परिसरात आहे. ग्रामस्थांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पोलीस बळाचा वापर करून आणि दबाव तंत्राचा अवलंब करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
"शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास ना प्रशासनाला वेळ आहे, ना त्या राजकीय नेत्याला. केवळ नफेखोरीसाठी आमच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा बळी दिला जात आहे."

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.