राज्यात इंधन तुटवड्याच्या अफवा खोट्या; पीएनजी सुविधा असलेल्या शहरांसाठीच नवा नियम, व्यावसायिक गॅस पुरवठ्यात ५० टक्के वाढ
मुंबई : राज्यात इंधन आणि एलपीजी तुटवड्याच्या अफवांदरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘तीन महिन्यांत सिलेंडर बंद होणार’ या अफवा पूर्णपणे खोट्या असून, भारत सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीएनजी नियमाबाबत काय म्हणाले?
पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांसाठी नवा नियम लागू होणार आहे. भुजबळ म्हणाले, “ज्या शहरांमध्ये पीएनजीची सुविधा आहे आणि तरीही त्यासाठी अर्ज केला नाही, तर त्या ठिकाणचा एलपीजी सिलेंडर तीन महिन्यांत बंद होऊ शकतो. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि तरीही पीएनजी लाईन बसवली गेली नाही, त्यांचा एलपीजी सुरूच राहील.”
हा नियम फक्त ज्या शहरांमध्ये पीएनजीचे काम सुरू आहे तिथेच लागू असेल, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्टीकरण
रशिया आणि व्हेनेझुएलाकडून इंधन पुरवठा सुरू असून भारताची जहाजे नियमितपणे सोडली जात आहेत. युद्धामुळे जागतिक स्तरावर परिणाम होत असला तरी भारतातील इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले. राज्यात कुठल्याही प्रकारचा इंधन किंवा गॅस तुटवडा नसून, नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
व्यावसायिक गॅस पुरवठ्यात ५० टक्के वाढ
व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एलपीजी साठ्यातही मोठी वाढ करण्यात आली असून, पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
रेशन धान्य मुबलक, तीन महिन्यांचा साठा घेता येणार
राज्यात धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांना तीन महिन्यांचे रेशन एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. साठवणुकीसाठी जागा कमी पडत असल्यामुळे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित नेले तरी काही अडचण नसल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच केरोसीनही उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासंदर्भात न्यायालयालाही माहिती देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या अफवाही खोट्या
राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी लागणार नसून, अर्ज केल्यानंतर ती सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असेल. ज्या भागात पीएनजी लाईन पोहोचली नाही, तिथे एलपीजी सेवा सुरूच राहणार आहे.
दरम्यान, सिलेंडरबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी साठेबाजी टाळावी, असेही भुजबळ म्हणाले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.