⚡ ब्रेकिंग News

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; खडसे पिता-कन्येविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल


 साखर कारखान्याच्या नावाखाली महार वतनाची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप; २००२ च्या खरेदीखतात खाडाखोड करून शारदा खडसेंच्या नावे केली नोंद

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाची जमीन हडपण्यात आल्याचा गंभीर आरोप खडसे पिता-कन्येवर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण २००२ सालचे आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. 

फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ उभारण्याचे आमिष दाखवले. जमिनीचा चांगला मोबदला देण्याचे आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन दिले. 

अशिक्षित असलेल्या चमेलाबाई तायडे यांच्या अंगठ्याच्या निशाणीवर ५१ हजार रुपये आगाऊ देऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी पूर्ण केल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्या जागी साखर कारखाना उभारला गेला नाही.

२०२५ मध्ये उघडकीस आलेले गंभीर फेरफार

२०२५ मध्ये तायडे कुटुंबाने जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. 

११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची प्रत तपासली असता, धक्कादायक फेरफार आढळला. खरेदीखतात जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव होते, तिथे खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव घुसवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

 गुन्हा दाखल

तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. 

चौकशीअंती बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील आणि तत्कालीन दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, २४ वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या जमिनीच्या व्यवहारामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. 

पोलिस तपासात अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...