'सातबारा कोरा'चे आश्वासन कुठे गेले? महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
कर्जमाफीत अटी, लाडकी बहीण योजनेत गोंधळ; हा कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प - उद्धव ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ते प्रत्यक्षात कोठेच दिसून येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा केवळ कंत्राटदारांसाठीच ठोस असून शेतकरी, कामगार आणि सामान्यांकडे दुर्लक्ष करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी कर्जमाफीबाबत संताप
उद्धव ठाकरे म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी आमच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्या वेळी कुठल्याच अटी लावल्या नव्हत्या. कोरोनाकाळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पीक कर्ज जाहीर केले होते. मात्र आताच्या सरकारने कर्जमाफी जाहीर करताना अनेक अटी लादल्या आहेत. निवडणुकीत दिलेले 'सातबारा कोरा'चे आश्वासन कुठे गायब झाले?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'लाडकी बहीण' आणि विकासकामांवर प्रश्नचिन्ह
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचे ठाकरे म्हणाले. राज्याची आर्थिक परिस्थिती सर्वश्रुत असताना कर्ज काढून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, 'कर्ज काढून दिवाळी साजरी करणा-या अर्थसंकल्पा'सारखे हे चित्र असल्याची टीका त्यांनी केली.
बुलेट ट्रेनपासून वृक्ष लागवडीपर्यंत सवाल
बुलेट ट्रेन प्रकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मुंबईचा सामान्य नागरिक अहमदाबादला जाऊन नेमके काय करणार? या योजनांसाठी निधी कुठून आणणार हे स्पष्ट नाही." तसेच ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणेवर निशाणा साधताना ते म्हणाले, "ही झाडे नेमकी कुठे लावणार? यासाठी जमीन कोठून आणणार? ही जमीन आरक्षित करण्याचा सरकारचा विचार आहे का?" असा सवाल करत पर्यावरणाच्या नावाखाली सरकार काहीतरी मोठा घोटाळा करू पाहत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
अखेर हा विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचा निष्कर्ष काढत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.