⚡ ब्रेकिंग News

बलात्कारप्रकरणी अटकेतील अशोक खरातचा खळबळजनक इतिहास; शिक्षणानंतर गायब, १५४ देशांचा प्रवास, बहुभाषिक कॅप्टनची अनामिका

बलात्कारप्रकरणी अटकेतील अशोक खरातचा खळबळजनक इतिहास; शिक्षणानंतर गायब, १५४ देशांचा प्रवास, बहुभाषिक कॅप्टनची अनामिका

'मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ ते बलात्काराचा आरोपी'; तपासात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त, अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा होता संपर्क

नाशिक: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. त्याच्या अटकेनंतर समोर येत असलेली माहिती अधिकच खळबळजनक आहे.

कोण आहे अशोक खरात?

६७ वर्षीय अशोक खरात हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील रहिवासी आहे. शालेय शिक्षणानंतर तो अचानक गायब झाला होता. अनेक वर्षांनंतर अचानक प्रकट झालेल्या खरातने आपण मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असल्याचे सांगितले. तब्बल २२ वर्षे नेव्हीमध्ये सेवा केल्यानंतर त्याने १५४ देशांचा प्रवास केल्याचेही सांगितले जाते. या प्रवासादरम्यान त्याने अनेक भाषा आत्मसात केल्याने तो बहुभाषिक असून, विविध देशांच्या धार्मिक चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीचा त्याला सखोल अभ्यास असल्याची चर्चा आहे.

बड्या बड्यांचा होता दरबार

मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर खरातने कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा तो अध्यक्ष होता. भविष्य जाणून घेण्यासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याचे समोर आले आहे.

तपासात ५८ व्हिडीओ जप्त

तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त केले आहेत. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये खरात धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरातविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. बुधवारी (१८ मार्च) पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर अशोक खरातच्या भूतकाळातील अनेक गूढ दालनं समोर येत असून, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...