पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नसेल तर बारामतीत आमच्याकडे अनेक पर्याय; काँग्रेसची भूमिका जाहीर
हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य; लक्ष्मण हाकेंनीही शड्डू ठोकला, बारामतीत तिहेरी लढतीची शक्यता
रायगड : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य करताना म्हटलं आहे की, बारामती पोटनिवडणूक जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार नसेल तर त्यांनी तसं सांगावं, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
शरद पवारांच्या पक्षाने भूमिका स्पष्ट करावी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. मागील दोन्ही निवडणुका तुतारी चिन्हावर लढवण्यात आली होती. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी. अंतिम निर्णय हा महाविकास आघाडी घेईल.”
विजय वडेट्टीवार यांचीही भूमिका
यापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. बारामतीची निवडणूक जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार नसेल तर काँग्रेस लढवेल, असं वडेट्टीवार म्हणाले होते.
बारामतीत तिहेरी लढतीची शक्यता
बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हं आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
“सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा,” असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम
| कार्यक्रम | तारीख |
| निवडणुकीची अधिसूचना जारी | ३० मार्च २०२६ |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत | ६ एप्रिल २०२६ |
| अर्जांची छाननी | ७ एप्रिल २०२६ |
| अर्ज मागे घेण्याची मुदत | ९ एप्रिल २०२६ |
| मतदानाची तारीख | २३ एप्रिल २०२६ |
| मतमोजणी | ४ मे २०२६ |
| निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख | ६ मे २०२६ |
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.