ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कर्तबगारीचे धडे; पालक-शिक्षक संवाद परिसंवाद यशस्वी
मासाळवाडी: माणगंगा शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सुभाचिंतन समारंभ व पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद परिसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पदवीधर आदर्श शिक्षक माननीय किरण बोराटे सर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक डॉ. वसंत मासाळ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुढे जाण्याचे आवाहन केले.
"सामान्य कुटुंबातील तरुण करू शकतो मोठी कामगिरी"
किरण बोराटे सर पुढे म्हणाले, "माणगंगा शैक्षणिक संकुलाची स्थापना ही सर्वसामान्य विद्यार्थ्याला कर्तबगार माणूस बनविण्यासाठी करण्यात आली आहे. आदरणीय डॉ. वसंत मासाळ हे आश्रमशाळेत शिकलेले, सामान्य कुटुंबातील तरुण असूनही ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाचा वसा घेऊन आज डॉक्टर झाले आहेत. माणसाची जाण असणारे हे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांचाच आदर्श घेऊन तुम्ही पुढे गेलात, तर तुमची प्रगती नक्कीच शक्य आहे."
विद्यार्थ्यांच्या यशावर विश्वास
केंद्रप्रमुख दीपक कुमार पतंगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ परीक्षेत नक्कीच मिळेल, असा विश्वास दिला. ते म्हणाले, "माणगंगा संकुलाचा दहावीचा शंभर टक्के निकालाचा रेकॉर्ड कायम ठेवण्याची ताकद तुमच्यात आहे. गुरुजनांनी दिलेली शिक्षणरूपी शिदोरी परीक्षेत योग्य रीतीने उतरवा."
क्रांती न्यूजचे संपादक म्हणाले
कार्यक्रमाला क्रांती न्यूज चॅनलचे संपादक सचिन मेनकुदळे सर उपस्थित होते. ते म्हणाले, "माझे आणि या संकुलाचे ऋणानुबंध परिवारासारखे आहेत. खूप मेहनतीने उभ्या केलेल्या या संस्थेतून शिकून अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनीअरिंग तसेच स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी झाले आहेत. ही संस्था या परिसरासाठी एक आशेचा किरण आहे."
तीन दिवसीय संवाद परिसंवाद यशस्वी
याप्रसंगी संस्थापक डॉ. वसंत मासाळ यांनी मनोगत व्यक्त करताना मागील तीन दिवस चाललेल्या पालक-शिक्षक संवाद परिसंवादाचा आढावा घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि अडचणी व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून पालकांना दाखविण्यात आल्या. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात थेट संवाद व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी डॉ. मासाळ यांची घोषणा
डॉ. वसंत मासाळ यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून संस्थेमध्ये विज्ञान शाखेचे अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः मुलींसाठी उच्च शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे.
विविध क्षेत्रातील यशोगाथा
चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमासोबतच क्रीडा क्षेत्रातही संस्थेने मोठी कामगिरी केली आहे. शाळेच्या मुलींच्या टेनिक्वाईट संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर आपली प्रतिभा गाजवली. तसेच बालबाजार, पतंग बनवणे, गणपती बनवणे, किल्ले बनवणे आदी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले की ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतो.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका व नूतन नगरसेविका सौ. सविता मासाळ, संस्था सचिव नारायण मासाळ, सुखदेव मासाळ, शिक्षक सजगाने सर, विद्या घाडगे मॅडम, सारिका माने मॅडम, म्हेत्रे मॅडम, भोसले मॅडम, वाघमारे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रावसाहेब मासाळ यांनी केले तर आभार राऊत मॅडम यांनी मानले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला कपाट भेट दिल्याचे विशेष स्मरणीय ठरले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.