⚡ ब्रेकिंग News

सांगलीत 'किंगमेकर' सुहास बाबर आक्रमक

 

सांगलीत 'किंगमेकर' सुहास बाबर आक्रमक; पडळकरांच्या अध्यक्षपदाच्या स्वप्नाला 'खो', जुन्या वादाचा हिशोब चुकता करणार!

सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सुहास बाबर यांच्यातील जुना संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, बाबर यांनी पडळकर गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील तोडफोड आणि वैयक्तिक टीकेचा वचपा काढण्यासाठी बाबर यांनी 'बंडाचा' झेंडा फडकवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमका वाद काय?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विद्याताई मोटे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची झालेली तोडफोड आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेली खालच्या पातळीवरील टीका सुहास बाबर यांच्या जिव्हारी लागली आहे. "राजकारणात पातळी सोडून वागणाऱ्यांना धडा शिकवणारच," असा निर्धार व्यक्त करत बाबर यांनी पडळकर गटाला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा चंग बांधला आहे.

बाबर ठरले 'किंगमेकर'

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार सुहास बाबर यांच्या ६ सदस्यांची साथ अनिवार्य आहे. बाबर यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमताचा आकडा गाठणे अशक्य असल्याने, सध्या सुहास बाबर हे 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले आहेत.

भाजप नेत्यांची पंचाईत

आमदार बाबर यांनी 'काहीही झाले तरी पडळकर गटाचा अध्यक्ष नको' अशी ठाम भूमिका घेतल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पडळकरांची महत्त्वाकांक्षा आणि दुसरीकडे बाबर यांची नाराजी, अशा कात्रीत पक्ष सापडला आहे.

आता भाजपचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात? सुहास बाबर आपली भूमिका बदलतात की पडळकरांचे स्वप्न धुळीस मिळवतात? याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...