मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत एकाच केंद्रावर १० बोगस विद्यार्थी; केंद्रप्रमुखाच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल
सोलापूर/बीड: राज्यात एसएससी दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रावर चक्क दहा बोगस (तोतया) विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले आहेत. यामध्ये नऊ तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. केंद्रप्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे घडली. या केंद्रावर मंगळवेढ्यातीलच सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत होते.
अशी उघडकीस आली फसवणूक
केंद्रप्रमुख विठ्ठल एकमल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासणी करताना ही बाब उघडकीस आली. दहा विद्यार्थी हे त्यांच्या ओळखपत्रातील फोटोशी जुळत नसल्याचे आढळून आले. यामध्ये नऊ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांविरोधात केंद्रप्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करत रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बीडमध्ये गैरकारभार उघड; मृत ग्रामसेवकाचा समावेश बैठे पथकात
दुसरीकडे, बीड जिल्ह्यात दहावी-बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. येथे पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या एका ग्रामसेवकाचा समावेश परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या बैठे पथकात (गलथान पथक) करण्यात आला आहे.
२०२१ साली आजारपणामुळे निधन झालेले ग्रामसेवक अरविंद आगलावे यांचा या पथकात समावेश आहे. गटशिक्षण अधिकारी समंदर खान यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना गटशिक्षण अधिकारी खान यांनी ही यादी पंचायत समितीच्या माध्यमातून आल्याचे सांगत चूक मान्य केली.
बीड जिल्ह्यात यापूर्वीही परीक्षांदरम्यान कॉपीच्या घटना घडल्या आहेत. आता मृत अधिकाऱ्याचा पथकात समावेश केल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोलापूरमधील बोगस विद्यार्थ्यांचा प्रकार आणि बीडमधील हा गैरकारभार यामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
-Picsart-AiImageEnhancer.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.