क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सोलापूर जिल्हा बँक ही भाजप स्वबळावर लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असून माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ही सध्या जिल्ह्यात फिरू लागल्याने जिल्हा बँकेची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अशातच आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा बँक ही भाजप स्वबळावर लढवेल आणि जिंकेल असे सांगितले.
त्याचबरोबर "जे समविचारी सोबत येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ," असे संकेतही त्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे मजबूत नेते असून ते या निवडणुकीसंदर्भात बसून ठरवतील आणि त्या पद्धतीने निवडणूक होईल.
"मी पालकमंत्री आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून जरी असलो तरी जिल्ह्यातील भाजप स्वबळावर जिल्हा बँक जिंकेल," असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
ही निवडणूक महायुती म्हणून लढवू आणि जिंकू असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
गेल्यावेळी या दोन्ही जागांवर भाजपचा जोरदार पराभव झाला होता. त्यानंतर आता पक्षाने मतदार नोंदणीपासून जोरदार तयारी केली आहे. अशावेळी ही निवडणूक महायुती म्हणून सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. "मात्र ऐनवेळी पक्षाने निर्णय घेतल्यास स्वबळावर ही भाजप पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवेल आणि जिंकेल," असाही दावा गोरे यांनी केला आहे.
पुढचे संपूर्ण वर्ष सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे या पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे लागणार असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
"पहिल्यांदा वर्षभर लागणारे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीचे पाणी आरक्षित करावे लागणार," असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
"जिल्ह्याची परिस्थिती खूप काळजी करण्यासारखी असून आता उजनीचा प्रत्येक थेंब व्यवस्थित नियोजन केल्यानेच पुढचे संपूर्ण वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही," असे ते म्हणाले.
"सर्वात आधी पिण्याचे पाणी, त्यानंतर जनावरांच्या पाण्याची नियोजन करून मगच शेतीसाठी पाणी द्यावे लागणार," असेही गोरे यांनी सांगितले आहे.
"आज सप्टेंबरमध्येही हीच परिस्थिती असून पुढचे संपूर्ण वर्ष हे उजनीच्या पाण्यावरच काढावे लागणार असल्याने अतिशय काटेकोर नियोजन करावे लागणार आहे," असे गोरे यांनी सांगितले आहे.
| मुद्दा | तपशील |
| जिल्हा बँक निवडणूक | भाजप स्वबळावर लढवेल आणि जिंकेल |
| समविचारी | सोबत येतील त्यांना घेऊन पुढे |
| शिक्षक-पदवीधर | महायुती म्हणून लढू; वेळ पडल्यास स्वबळावरही तयारी |
| उजनी धरण | प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन |
| पाणी प्राधान्यक्रम | पिण्याचे → जनावरांचे → शेती |
| परिस्थिती | सप्टेंबरमध्येही काळजी करण्यासारखी |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.