क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पुणे - पुण्यात गणेशोत्सव आणि सार्वजनिक सणांमध्ये डीजे तसेच लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांना थेट कॅमेऱ्यासमोर मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण पुण्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. हल्लेखोर संतोष चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक भूमिका घेत या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. “एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
सुप्रिया सुळे एबीपी माझाशी बोलताना अत्यंत संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, “या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. माझं विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर बोलणं झालं आहे. मी स्वतः माझ्या ओळखीतले वकील त्यांच्या मदतीला तातडीने पाठवत आहे. ही गलिच्छ प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सातत्याने यात पुण्याची बदनामी होत आहे. राज्याची देखील बदनामी होत आहे. या गलिच्छ प्रवृत्तीच्या मागे कुठली अदृश्य शक्ती आहे? एखादी व्यक्ती जर आपले मत मांडत असेल तर तुम्ही त्याला येऊन मारहाण करणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी याचा जाहीर निषेध करते. माणुसकीच्या नात्याने आम्ही बापटांच्या मागे ताकदीने उभे राहणार.”
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक झालीच पाहिजे. त्याच्या मागे कोणती यंत्रणा काम करत आहे याचा शोध घेतला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
“पुण्यातील गुंडागर्दी वाढली असून त्याची चौकशी झालीच पाहिजे. हे प्रकार असेच वाढत असतील तर आता मुख्यमंत्र्यांना नाही तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून न्याय मागावा लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला.”
बापट पुढे म्हणाले, “या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का?”
त्यांनी स्पष्ट केले की, “उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करू शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही.”
विद्यानंद बापट हे पुण्यातील टिळक रोड परिसरात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. ते गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर आपली भूमिका मांडत होते. याचदरम्यान एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हल्लेखोराची ओळख संतोष चव्हाण अशी झाली आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा बापट यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सभेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी विरोध केला होता आणि पोलिसांना बापट यांना सभेतून बाहेर काढावे लागले होते.
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण – कॅमेऱ्यासमोर झालेली घटना.
ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका – गणेशोत्सवात डीजे-लाऊडस्पीकरवर बंदीची मागणी.
सुप्रिया सुळेंचा निषेध – ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’; हल्लेखोराच्या मागे अदृश्य शक्तीचा संशय.
अमित शाहांपर्यंत मुद्दा – राज्यात गुंडागर्दी वाढल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन करण्याचा इशारा.
बापट यांची प्रतिक्रिया – ‘सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला’; पोलिसांनी कारवाई करावी.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.