महिलेवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल; खरातच्या संस्थेत रुपाली चाकणकर विश्वस्त; सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच केला सवाल
नाशिकमधील बहुचर्चित स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात या भोंदूबाबाला क्राइम ब्रँचने अटक केली आहे. एका महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "यापूर्वीही अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता."
अंधारे पुढे म्हणाल्या, "अशोक खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर रुपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यक्रमात चाकणकर जातीने आवभगत करताना दिसल्या होत्या. आता आम्हाला शंका नव्हे, तर भीती आहे की पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर या 'लिंगपिसाट' माणसाला मदत करतील का?"
सुनेत्रा पवार यांना सवाल
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही सवाल केला आहे. "योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का? की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोण आहे अशोक खरात?
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील 'श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'चा अध्यक्ष असलेला अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अधिकारी आहे. तो स्वतःला प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखत असे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या मंदिरात भेट दिल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता या भोंदूबाबाचे खरे रूप उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.