'महाराष्ट्र-नेक्स्ट'च्या संकल्पासह राज ठाकरेंचा सोशल मीडियावर दणका; 'पुढचा महाराष्ट्र घडवूया' म्हणत लाँच केले नवे मिशन
गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी मनसे अध्यक्षांचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल; शेतकरी, कष्टकरी, तरुणांना एकत्र करत नव्या युगाच्या महाराष्ट्राचे स्वप्न
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१९ मार्च) होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी सोशल मीडियावर एक धडाकेबाज व्हिडिओ पोस्ट करत 'महाराष्ट्र-नेक्स्ट' (Maharashtra-Next) हे नवे अभियान लाँच केले आहे. "नव्या पिढीचा, नव्या युगाचा, पुढचा महाराष्ट्र घडवूया," असा संकल्प या अभियानातून व्यक्त करण्यात आला असून, 'आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा, आपल्यालाच विचार करायचा' असा नारा देत राज ठाकरे यांनी नव्या पिढीला साद घातली आहे.
अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज आणि कष्टकरी जनतेचे प्रतिबिंब उमटवण्यात आले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रायगडासारख्या किल्ल्यांची विहंगम दृश्ये दाखवत, "दिल्लीचेही तख्त झुकावे, शौर्य असे दाखवूया" या ओळींतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली आहे. शेतकरी, कष्टकरी आणि चाकरमानी यांच्या योगदानाचा गौरव करत, भविष्यातील महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन या व्हिडिओतून करण्यात आले आहे.
नेमके कोणते स्वप्न?
उद्योजक, नोकरी करणारे तरुण आणि सामान्य नागरिक या सर्वांना एकत्र घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न 'महाराष्ट्र-नेक्स्ट'च्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. व्हिडिओच्या शेवटी मनसेचे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आणि 'महाराष्ट्र-नेक्स्ट' हे लोगो झळकतात. राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली रणनीती स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
आज संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे बंधूंच्या नुकत्याच झालेल्या राजकीय युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने सर्वांचे लक्ष या सभेवर लागले आहे. या मेळाव्यात राज ठाकरे 'महाराष्ट्र-नेक्स्ट' अभियानाबाबत अधिक मार्गदर्शन करणार असून, पक्षाची आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करतील. यापूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरलेल्या रणनीतीचाच एक भाग म्हणून आजचा मेळावा आणि हे नवे अभियान असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर विशेष दोन स्क्रीन लावण्यात आल्या असून, या मेळाव्यात राज ठाकरे नेमके काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.