दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचा अखेरचा ‘बेवारस’; निधनानंतर तीन वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
हृदयस्पर्शी कथेचं पोस्टर प्रदर्शित; आता लवकरच चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता
मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट ‘बेवारस’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, हा चित्रपट निधनानंतर तब्बल तीन वर्षांनी रिलीज होणार आहे.
हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित ‘बेवारस’ या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सने केली आहे. हरिणी प्रॉडक्शन्सच्या रिया कुमार व नितीन विचारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांचे असून, पटकथा व संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीतलेखन व संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा यांनी केले तर महेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत तर यश सुर्वे यांनी संकलन केले आहे.
विक्रम गोखले यांच्यासह या चित्रपटात तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पोस्टरवर डोळे भरून आलेले विक्रम गोखले यांनी एका लहान मुलाला मिठी मारल्याचं हृदयस्पर्शी चित्र आहे. अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे. एक लहान अनाथ मुलगा आपल्या अधिकारांसाठी आपल्याच आई-वडिलांना कोर्टात का खेचतो, या मुलाच्या संघर्षाची अनोखी कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. सोबतच सामाजिक परिस्थितीचाही पदर या कथानकाला आहे. विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.