⚡ ब्रेकिंग News

मार्क झुकरबर्ग यांची कोर्टात खरडपट्टी; मेटावर मुलांना व्यसन लावल्याचा गंभीर आरोप

 मार्क झुकरबर्ग यांची कोर्टात खरडपट्टी; मेटावर मुलांना व्यसन लावल्याचा गंभीर आरोप

लॉस एंजेलिस - सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लहान मुलांना जाणीवपूर्वक व्यसन लावल्याप्रकरणी मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची अमेरिकेतील न्यायालयात चांगलीच खरडपट्टी झाली. लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या ऐतिहासिक खटल्यात झुकरबर्ग यांना अनेक कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागले.

नेमका प्रश्न काय?

या खटल्यात मेटा कंपनी (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपची मालक) आणि गुगलच्या यूट्यूबवर मुलांना जाणीवपूर्वक प्लॅटफॉर्मवर रोखून ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यसन लावण्यासाठी अल्गोरिदम डिझाइन केल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, 9 वर्षांचे मूल अकाउंट तयार करताना लांबलचक अटी व शर्ती वाचू शकत नाही, मग कंपनी हे कसे गृहीत धरू शकते की मुले समजूतदारपणे अकाउंट तयार करत आहेत?

पालकांचा थेट सवाल

न्यायालयात अशा अनेक पालकांनी हजेरी लावली होती, ज्यांच्या मुलांनी सोशल मीडियाच्या दुष्परिणामांमुळे आत्महत्या केली. एका पालकाने झुकरबर्ग यांना थेट प्रश्न विचारला की, "मुले आत्महत्या करणार नाहीत अशा प्रकारे अल्गोरिदम बदलणे खरोखर इतके अवघड आहे का?" यावर झुकरबर्ग यांनी असा दावा केला की वकिलांनी अंतर्गत संवादांचा चुकीचा अर्थ लावला आहे आणि कंपनीने नेहमीच तरुण वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत.

कंपनीचे अंतर्गत दस्तऐवज कोर्टात

फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात मेटाची काही अंतर्गत ईमेल आणि मेसेजेस सादर केले. यात असे दिसून आले की:

मेटाला 13 वर्षांखालील मुले त्यांचे प्लॅटफॉर्म वापरत असल्याची माहिती होती

कंपनीने या वयोगटातील मुलांना टिकवून ठेवण्याबाबत चर्चा केली होती

2015 आणि 2017 च्या ईमेलनुसार, झुकरबर्ग यांनी अधिकाऱ्यांना युजर्सचा प्लॅटफॉर्मवर घालवलेला वेळ वाढवण्याचे आदेश दिले होते

मेटाचे जागतिक व्यवहार प्रमुख निक क्लेग यांनी 2019 मध्ये झुकेरबर्ग यांना ईमेल पाठवून कंपनीच्या वयोमर्यादेच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे म्हटले होते

झुकरबर्ग यांचा बचाव

सुनावणीदरम्यान झुकरबर्ग काही प्रश्नांवर अस्वस्थ दिसले. त्यांनी आपल्या बचावात म्हटले की:

कंपनीने अल्पवयीन मुलांना ओळखण्याच्या पद्धती सुधारल्या आहेत

अनेक मुले अकाउंट तयार करताना खोटी वयाची माहिती देतात, जी कंपनी ओळखून काढून टाकण्याचा प्रयत्न करते

किशोरवयीन मुलांकडून मिळणारा जाहिरात महसूल 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे

13 वर्षांखालील मुलांसाठी 'मेसेंजर किड्स' सारखे सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे प्रयत्न केले आहेत

किती मुले वापरतात सुरक्षा साधने?

मेटाने मुलांच्या सुरक्षेसाठी अनेक साधने उपलब्ध करून दिल्याचा दावा केला असला, तरी वकिलांनी निदर्शनास आणून दिले की केवळ 1.1 टक्के किशोरवयीन मुले दररोजच्या वापराची मर्यादा सेट करणाऱ्या साधनांचा वापर करतात.

खटल्याचे महत्त्व

हा खटला अजून काही आठवडे चालण्याची शक्यता आहे. यात गुगलचे यूट्यूब देखील प्रतिवादी आहे. या खटल्याचा निकाल सोशल मीडिया उद्योगासाठी दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. हजारो समान खटल्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

झुकरबर्ग यांनी मात्र आपल्या बचावात सांगितले की, "जर एखादी गोष्ट मौल्यवान असेल, तर लोक तिचा वापर जास्त करतात." मात्र, न्यायालयात मांडल्या जात असलेल्या पुराव्यांवरून कंपनीची भूमिका अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...