क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
छत्रपती संभाजीनगर / मुंबई - शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
"पुरस्कार श्री, स्वतःच स्वतःला पुरस्कार घेत आहेत. आमदार-खासदार तर विकत घेत आहेत, पुरस्कार पण विकत घेत आहेत," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "जे स्वतःच्या विकासासाठी तिकडे गेलेत, मराठवाड्याच्या विकासाचं नाव घेऊन, त्यांनी हिम्मत असेल, तर मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणे पंतप्रधानांच्या समोर मांडू शकता का?" असा थेट सवाल त्यांनी केला.
"आपल्याला सांगतील, 'ये तुमसे ना हो पाएगा'. हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार. म्हणजे ते उलट आपल्याला सांगतील, 'जो हमने किया, पुरस्कार खरीद लिया, ये तुमसे ना हो पाएगा!'," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, "मराठवाड्यासाठी झालेल्या अन्यायावर, अन्यायाबद्दल जे काही तुम्ही वाचा फोडत आहात, तुम्हाला सगळ्यांना आपले दयाळू पंतप्रधान माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे कर्जमाफी नाही करणार, पण तुम्ही न्याय हक्कासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल तुम्हाला ते नक्की माफ करतील."
मराठवाड्यातील वास्तव आणि सरकारच्या जाहिरातींतील फरकाकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे म्हणाले, "ते नुसते बोर्ड बघून मी गेलो, मला असं वाटलं की, मराठवाड्यात तर काय आनंदी आनंदच आहे. इकडे दुष्काळ कुठे? इकडे तर दुधाचा पाऊस पडत असेल, पण जमिनीवर काय आहे? हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही."
त्यांनी सरकारच्या जाहिरातींवरही निशाणा साधला. "आज जाहिराती बघितल्या, त्या जाहिरातींचा खर्च तुम्ही मराठवाड्याला द्यायला पाहिजे होतं. हे गरीब शेतकऱ्याचा पोरग हेलिकॉप्टरने आपल्या शेतीत जातं आणि परदेशात जाऊन पुरस्कार विकत घेत आहे," असे ते म्हणाले.
कर्नाटकने दुष्काळ जाहीर केल्याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्नाटकमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि आम्ही पंचांग बघून सगळे करतो. पंचांग बघून ५ ऑक्टोबरचा मुहूर्त आहे बरे? तोपर्यंत किती शेतकरी जीव देतील, कसला मुहूर्त बघताय?" असा घणाघाती सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वीही शिवसेना (UBT) नेते आमदार कैलास पाटील यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आत्महत्यांसाठी थेट सरकारला जबाबदार धरले. "शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. त्यांची सीबीआय चौकशी करा," अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाड्यात पावसाने दिलेल्या दांडीमुळे महाभयंकर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. धाराशिव जिल्ह्यात लाखो हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीन अक्षरशः करपून गेले आहे. मराठवाड्यात १ जूनपासून सरासरीच्या तुलनेत पावसाची सुमारे २५ टक्के तूट आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही "भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, नाहीतर आत्महत्या वाढतील" असे सरकारला साकडे घातले आहे.
उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल: 'निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार'.
पुरस्कार विकत घेण्याचा आरोप: 'आमदार-खासदार विकत घेतले, आता पुरस्कार'.
पंतप्रधानांसमोर आव्हान: 'हिम्मत असेल तर मराठवाड्याच्या व्यथा मांडा'.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी: 'कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा'.
पंचांगवर टीका: '५ ऑक्टोबरचा मुहूर्त? तोपर्यंत किती शेतकरी जीव देतील?'
सीबीआय चौकशीची मागणी: शेतकरी आत्महत्यांना सरकार जबाबदार.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.