छातीवर बसून गळा घोटला; मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे; पोलिसांच्या तपासात खुनाची कबुली; प्रियकरासह पत्नी अटकेत
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
सांगली : पुण्यातील केतन अग्रवाल (Ketan Agrawal Pune Lohagadh Case) हत्या प्रकरण ताजे असतानाच सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा छातीवर बसून गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . विशेष म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही पत्नीने रचला होता. प्रेमविवाह केल्यानंतर दोन मुले असताना पत्नीने हे कृत्य केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळमळा, सांगली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे . सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा आनंद हणमंत सर्जे हा पत्नी आणि दोन मुलांसह पोळ मळ्यात राहत होता . गुरुवारी (२५ जून) पहाटे त्यास पत्नी आणि मेहुण्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले . मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे; संशय बळावला
डॉक्टरांनी कळविताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली . त्यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसत होते. संशय बळावल्याने अधिक तपास सुरू केला.
पत्नीकडे चौकशी केली असता, आनंद यांना मारहाण झाली होती. त्यानंतर घरी झोपल्यानंतर मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. परंतु तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला . त्यावेळी खुनाचा उलगडा झाला.
पत्नीसह प्रियकराची अटक; खुनाची कबुली
उत्तरीय तपासणीत खुनाची बाब स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) आणि तिचा प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले . चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.
पती आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता. याच कारणातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले . गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिने प्रियकराला बोलावून घेतले. सर्जे याचे पाय ओढणीने बांधल्यानंतर दोघांनी छातीवर बसून त्याचा जीव घेतला.
प्रेमविवाहानंतरही दुसऱ्यात जीव अडकला!
पल्लवीने आनंदशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत – एक तीन वर्षांचा आणि दुसरे अवघ्या तीन महिन्यांचे बाळ. मात्र, वैवाहिक जीवनातील त्रासाला कंटाळून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. अवघ्या तीन महिन्यांचे बाळ आईचे दूध पीत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात आईसोबतच ठेवण्यात आले आहे.
अंत्यविधीच्या ठिकाणाहून पोलिसांनी उचललं!
मृत आनंद सर्जे हे मूळचे जत तालुक्यातील गुड्डापूर गावचे रहिवासी होते . उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नातेवाईक आनंद यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुड्डापूर येथे घेऊन गेले. पतीचा खून करूनही पल्लवी अत्यंत शांतपणे नातेवाईकांसोबत अंत्यविधीसाठी गुड्डापूरला गेली होती. मात्र, पोलिसांनी गुड्डापूर गाठले आणि अंत्यविधीच्या ठिकाणाहूनच पल्लवीला ताब्यात घेतले.
पोलिसांची कारवाई
याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या घटनेची माहिती दिली . अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेमविवाह करूनही पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. गुरुवारी पहाटे किरकोळ वादातून पतीचा खून करून झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र, मृतदेहावरील ओरखडे आणि पत्नीच्या बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांनी सखोल तपास केला. उत्तरीय तपासणीत खुनाची पुष्टी झाल्यानंतर पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. तीन महिन्यांच्या बाळाला आईसोबत पोलीस ठाण्यात राहावे लागत आहे. पोलिसांनी आरोपींना कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.