'आरोपी परधर्मीय असेल तरच हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणार का? नितेश राणे, पडळकर, संग्राम जगताप, लांडगे अशोक खरातवर का बोलत नाहीत?' शरद पवार गटाच्या नेत्याचा सवाल
मुंबई : नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरातने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते विकास लवांडे यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांच्या 'सोयीच्या' भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी भाजपच्या आमदारांना थेट सवाल करत हिंदुत्वाच्या नावावर होणाऱ्या 'निवडक' आक्रोशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भोंदूगिरीवर हिंदुत्ववादी गप्प का?
विकास लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ज्याने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले, फसवणूक केली. अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात."
आमदारांना आणि संघटनांना थेट सवाल
लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपचे आमदार आणि विविध संघटनांना टॅग करत थेट जाब विचारला आहे. ते म्हणाले, "मात्र या विषयावर आरएसएस परिवारातील तथाकथित #हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, भिडेंचे धारकरी आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे, आमदार संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहात की नाही?"
आरोपी परधर्मीय असेल तरच संताप येतो?
विकास लवांडे यांनी अत्यंत परखड शब्दात विचारले आहे की, "फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार का? उघडा डोळे बघा नीट!" खरात प्रकरणातील पीडित महिला हिंदू असतानाही हिंदुत्वाचा टाहो फोडणारे नेते आता कुठे आहेत, असा सवाल करत त्यांनी #कॅप्टन_फाईल हा हॅशटॅग वापरून भाजपवर निशाणा साधला आहे.
लवांडे पुढे म्हणाले, "फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार का? उघडा डोळे बघा नीट ! #कॅप्टन_फाईल
नेमकं काय आहे प्रकरण?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले.
कोण आहे अशोक खरात?
अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे केले आहेत. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठीच्या उपायांसाठी अशोक खरातच्या संपर्कात असतात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विकास लवांडे यांचा सवाल का महत्त्वाचा?
अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली असताना, हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांनी या प्रकरणी मौन बाळगल्याचे विकास लवांडे यांनी अधोरेखित केले आहे. याआधी विविध धर्मियांविरोधातील आरोपांवरून हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले होते. मात्र, या प्रकरणात आरोपी हिंदू असताना कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने लवांडे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता भाजप आमदार आणि हिंदुत्ववादी संघटना या प्रकरणी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.