अन्नाची नासाडी राखी सावंतच्या अंगाशी, ड्रामा भोवला; भाऊच्या धक्क्यावर मिळणार मोठी शिक्षा, संपूर्ण सिझन..
मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये अभिनेत्री राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून घरातील समीकरणं बदलत चालली होती. कॉमेडी आणि ड्रामाचा तडका प्रेक्षकांना या शोमधून पाहायला मिळत होता. मात्र, आता राखीने मोठी चूक केली आहे. तिने जेवणाची नासाडी केल्याने भाऊच्या धक्क्यावर तिला तिच्या कृत्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा संपूर्ण सिझनसाठी असणार असल्याचे रितेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
नेमकं काय घडलं?
एका एपिसोडमध्ये राखी किचनमध्ये भाजी तयार करत होती. त्याचवेळी दीपालीने चहा बनवायला ठेवला होता. यावेळी राखीने मोठी चूक केली. तिने भाजीतील वांगं दीपालीने ठेवलेल्या चहामध्ये टाकले. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य राखीवर भयंकर चिडले आणि तिच्याशी भांडू लागले. भांडणानंतर राखीने भाजी फेकून दिली.
यानंतर राखीने मोठा ड्रामा केला. भाजीमध्ये थुंकी पडत असल्याचं कारण पुढे करत तिने भाजी फेकली असल्याचं सांगितले. मात्र, राखी सारवासारव करत असल्याचं घरातील स्पर्धकांना कळून चुकलं. यावेळी राखी भाजीजवळ गेली आणि तिने पश्चातापही व्यक्त केला. पण राखीला शिक्षा मिळणार, हे सदस्य वारंवार म्हणत होते. राखी हे सगळं ऐकून चिडली आणि "तुम्ही मला शिक्षा देणार, एवढी तुमच्यात इतकी हिंमत..." असं म्हणताना दिसली.
रितेश देशमुख यांची कडक शिक्षा
अन्नाची नासाडी केल्याचा विषय थेट भाऊच्या धक्क्यावर पोहोचला. रितेश देशमुख यांनी राखीला या कृत्याबद्दल चांगलंच झापलं. त्यांनी राखीला शिक्षा सुनावली. ही शिक्षा एक दिवस किंवा एक आठवड्यापुरती नसून संपूर्ण सिझनसाठी असणार असल्याचं रितेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रोमोमध्ये नेमकं काय?
कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख राखीला धारेवर धरताना दिसत आहेत. ते म्हणतात, "राखी तुम्हाला अन्नाची किंमत नाहीये. हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसत आहे. ही गोष्ट इथे खपवून घेतली जाणार नाहीये. तुम्हाला याची शिक्षा दिली जाणार. एक दिवस नाही तर, संपूर्ण सीझनसाठी ही शिक्षा असणार आहे."
या प्रोमोमध्ये राखी मान खाली घालून सर्व ऐकताना दिसत आहे. राखीला नेमकी कोणती शिक्षा मिळणार, हे भाऊच्या धक्क्यावर उघड होईल. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीच्या घरात राखीच्या वागण्यावर प्रेक्षकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. कधी तिचं ओरडणं, तर कधी घरातील वस्तू खराब करणं, तोडफोड करणं हे सुरूच होतं. मात्र, अन्नाची नासाडी केल्यानंतर प्रेक्षकांनीही तिला शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी केली होती. आता रितेश देशमुख यांनी सुनावलेली शिक्षा प्रेक्षकांना कशी वाटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राखीला संपूर्ण सिझनसाठी नेमकी कोणती शिक्षा मिळणार, हे पुढील एपिसोडमध्ये स्पष्ट होणार आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.