८६ वर्षीय सुवर्णलता यांचे निधन; पवन कल्याणसह सिनेसृष्टीतील दिग्गजांनी व्यक्त केला शोक
बेंगळुरू : साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांच्या आई सुवर्णलता यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी शनिवारी (२९ मार्च) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी (३० मार्च) अंतिम संस्कार करण्यात आले. प्रकाश राज यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
मेंदूच्या त्रासामुळे स्मरणशक्ती गेली होती
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णलता या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. प्रकाश राज यांनी अनेकदा आपल्या बोलण्यातून आईला मेंदूत सिस्ट (ब्रेन सिस्ट)चा त्रास असल्याचे सांगितले होते. यासाठी त्यांची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची स्मरणशक्ती गेली होती. त्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखू शकत नव्हत्या, अशी माहिती प्रकाश राज यांनी स्वतः दिली होती.
पवन कल्याण यांनी व्यक्त केला शोक
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले, “प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई श्रीमती सुवर्णलता गरू यांचे निधन झाले. याची माहिती मिळताच खूप दुःख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो. मी प्रकाश राज आणि त्यांच्या सर्व कुटुंबाप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.” पवन कल्याण यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करून शोक व्यक्त केला आहे.
प्रकाश राज यांच्या आईची जीवनगाथा
सुवर्णलता यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्याशा गावात झाला. त्यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. तरुणपणी त्यांनी एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम केले. तिथेच त्यांची भेट उपचार घेत असलेल्या त्यांच्या पतीशी झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर प्रेम फुलले. यानंतर दोघांनी मिळून संसार थाटला. या जोडप्याला तीन मुलं असून, प्रकाश राज हे सर्वात मोठे आहेत.
आयुष्याच्या खडतर प्रवासात अनेक अडचणींचा सामना करताना सुवर्णलता यांनी आपल्या संसाराची धुरा समर्थपणे सांभाळली. प्रकाश राज यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आईचे मोठे योगदान असल्याचेही सिनेसृष्टीत सांगितले जाते. दरम्यान, प्रकाश राज यांच्या आईच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.