⚡ ब्रेकिंग News

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणाचं एक्स्लुझिव्ह CCTV फुटेज हाती; उपजिल्हा रुग्णालयासमोर मृतदेह ठेवून ग्रामस्थ आणि नातेवाईकांचं आंदोलन


 शस्त्र परवान्यासाठी वाद, धक्काबुक्की, चौकशीचा अहवाल प्रलंबित; उपजिल्हा रुग्णालयाच्या उपाधीक्षकांसोबत प्रसाद कोंडे देशमुखाचा CCTV फुटेज समोर; आंदोलकांनी केल्या 5 प्रमुख मागण्या

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

सातारा / फलटण - फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येप्रकरणी आता एक्स्लुझिव्ह CCTV फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये रुग्णालयाचे उपाधीक्षक लीला मदने, प्रसाद कोंडे देशमुख, आणि डॉ. रुपनवर एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांनी उपाधीक्षकांच्या उपस्थितीत मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर काल (1 सप्टेंबर) पासून आंदोलन सुरू आहे. आज (2 सप्टेंबर) देखील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ठेवून आंदोलन चालू ठेवले आहे. आरोपींवर तात्काळ अटक करण्याची मागणी करताना मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 हाती लागलेल्या या फुटेजमध्ये प्रसाद कोंडे देशमुख आणि त्यांचा सुरक्षा रक्षक रुग्णालयाच्या उपाधीक्षक लीला मदने यांच्यासमोर उपस्थित आहेत. याच दरम्यान डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्याशी तीव्र वाद होतान दिसत आहे.

या फुटेजनंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, फलटण पोलिसांनी रुग्णालयासमोर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पाच मुख्य मागण्या करत आरोपींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

1.  आरोग्य उपसंचालक भगवान पवार, उपाधीक्षक लीला मदने, आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावर तात्काळ अटक करण्यात यावी.

2.  आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

3.  कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.

4.  कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी.

5.  या प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी.

मागील जुलै महिन्यात, प्रसाद कोंडे देशमुख ही व्यक्ती शस्त्र परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात आली होती. ती स्वतःला माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचे सांगत होती. वेळेची मर्यादा संपली असतानाही तात्काळ प्रमाणपत्र देण्याचा तिने आग्रह धरला.

मात्र, डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी नियमांचा हवाला देत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. या वादावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले, मात्र ही घटना डॉ. रुपनवर यांच्यासाठी वादाचा मुद्दा ठरली.

या घटनेनंतर प्रसाद कोंडे देशमुखने डॉ. रुपनवर यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याचा मानसिक त्रास सहन न झाल्याने डॉ. रुपनवर यांनी सुसाईड नोट लिहून सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

तसेच, फलटण शहर पोलिसांनी डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीवरून कोंडे देशमुख याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांनी डॉ. रुपनवर यांच्याविरोधात चौकशी समिती गठित केली. या समितीचा अहवाल बराच काळ प्रलंबित ठेवण्यात आला. अहवाल न मिळाल्याने वारंवार विचारणा करूनही न्याय न मिळाल्याने डॉ. रुपनवर यांनी मुंबई गाठली.

मुंबई येथे त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करत, डॉ. लीला मदने यांच्यावर कारवाई न झाल्यास स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याचा इशारा दिला होता. यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

CCTV फुटेज समोर: डॉ. रुपनवर, उपाधीक्षक लीला मदने, आणि प्रसाद कोंडे देशमुख एकाच फ्रेममध्ये.

मारहाणीचा आरोप: कुटुंबीयांनी उपाधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या धक्काबुक्कीचा आरोप केला.

आंदोलन सुरूच: मृतदेह ठेवून ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आंदोलन चालू ठेवले.

मागण्या: अटक, एक कोटी मदत, नोकरी आणि SIT चौकशी.

पूर्वघटना: फिटनेस सर्टिफिकेटवरून वाद आणि चौकशी अहवाल प्रलंबित.

सुसाईड नोट आणि व्हिडीओ: मानसिक त्रासामुळे डॉक्टरांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...