आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश
खानापूर : प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील आळसंद येथील प्रसिद्ध श्री लिंगेश्वर महाराज मठाच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत मठाच्या विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.
श्री लिंगेश्वर महाराज मठ हे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विविध धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे मठ परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मठाच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, २ कोटी रुपयांच्या निधीतून मठाच्या इमारतीची सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय तसेच भोजन कक्षाची सुविधा यांसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मठात येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आळसंद येथील श्री लिंगेश्वर महाराज मठासाठी मंजूर झालेला निधी हा त्याच विकासदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
याबाबत आमदार सुहास बाबर म्हणाले, “आळसंद येथील श्री लिंगेश्वर महाराज मठ हे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मठाच्या विकासकामांना निधी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने २ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचा मनस्वी आनंद आहे. या निधीतून मठाची इमारत सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय आणि भोजन कक्षाची सुविधा निर्माण होणार आहे. खानापूर मतदारसंघातील धार्मिक व पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू.”

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.