क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डीजे (DJ) आणि डॉल्बी (Dolby) साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर करणाऱ्यांना त्यांनी सुनावले. ते म्हणाले, "ज्यावेळी गणपती आपण घेऊन जातो, तेव्हा मोकळं मोकळं वाटतं घर. तो जो उत्साह असतो, तो गेल्यासारखा वाटतो. ते वाईट वाटण्याच्या ऐवजी कसला आनंद आपण व्यक्त करतोय आणि डॉल्बी आणून काय होणार आहे?".
राज ठाकरे यांनी डॉल्बीच्या वापराची तुलना उत्तर भारताशी करत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "गोविंदाच्या वेळी महिलांना व्यासपीठावर आणून नाचवायचं, हे सगळं उत्तरेत चालतं. उत्तर प्रदेश, बिहार वगैरे या भागात चालतं. ते आपण महाराष्ट्रात आणतोय का? अहो आपण त्यांना शिकवायचं का त्यांचं आपण घ्यायचं?" .
राज ठाकरे म्हणाले, "ते लेझर लाईट काय मारतायत? अनेकांचे डोळे गेलेत, अनेकांचे कान गेलेत. ज्याला जराजरी हार्टचा त्रास असेल, या डॉल्बी आणि साऊंडमुळे हार्ट अटॅकने मरू शकतो माणूस. गेले पण आहेत अनेक लोकं. कुठे नेतोय आपण सण?" .
राज ठाकरे यांनी धर्मांधपणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "धर्मामध्ये बेभान होऊ नये. उत्सव हा इथपर्यंत ठीक आहे, परंतु धर्मांधपणा हा अत्यंत वाईट. हा खड्ड्यातच घेऊन जाणार आपल्याला."
त्यांनी इतर देशांची तुलना करत म्हटले, "जे देश धर्माच्या नावाखाली उभे राहत होते, आज ते देश कुठे चाललेत आपल्यापेक्षा? आपल्या देशापेक्षा पुढे चाललेत आणि आम्ही मागे चाललोय. ते सुधारतायत. आमचं लक्षच नाही उद्योग-धंद्याकडे, नोकरीकडे, व्यवसायाकडे, शिक्षणाकडे, शेतीकडे. आमचं फक्त लक्ष आहे धर्मात." .
राज ठाकरे यांनी गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, "आता गणपती येतील. मला सर्वात जास्त भीती आहे, या गणपतीच्या दिवसांमध्ये दंगली घडवल्या जातील. जेणेकरून फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये अडकले पाहिजेत. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे."
राज ठाकरे पुढे म्हणाले, "जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुसलमान आहे, मला दोघांनाही सांगायचंय, सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने हे कोणतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. नाहक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील." .
त्यांनी स्पष्ट केले, "एक-दुसऱ्याचा दुस्वास करणे, यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवणे आणि मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे, एवढा फक्त कार्यक्रम आत्ता चालू आहे. देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे." .
राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. डीजे व लेझर लाईटवरून नागपूर, पुणे, मुंबईत वाद सुरू आहेत . आता राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे या वादाला एक नवी दिशा मिळाली आहे.
राज ठाकरे यांची डीजे वापरकर्त्यांना फटकार: "कसला आनंद आणताय?"
उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणण्यावर आक्षेप: "गोविंदाच्या वेळी महिलांना नाचवणं उत्तरेत चालतं."
ध्वनीप्रदूषण आणि आरोग्य धोका: "लेझर लाईटमुळे डोळे-कान गेलेत; हार्ट अटॅकचा धोका."
धर्मांधपणाचा इशारा: "धर्मांधपणा खड्ड्यात घेऊन जाणार."
गणेशोत्सवात दंगल होण्याची शक्यता: "सुजाण हिंदू-मुसलमानांनी सतर्क राहावे."

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.