क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये अवघ्या दोन वर्षांत तब्बल ५९० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे राज्य सरकारच्या कारभारावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून केवळ दोन लाख रुपये देण्यात आल्याने त्यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर परखड शब्दांत टीका केली आहे.
अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर ट्विट करत या गंभीर मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. "जेव्हा दुर्लक्ष, देखभालीचा अभाव, गैरव्यवस्थापनामुळे या निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या हातात फक्त २ लाख रुपये टेकवले जातात," अशा शब्दात दिपके यांनी खंत व्यक्त केली.
दिपके यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये अवघ्या दोन वर्षांत ५९० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून केवळ २ लाख रुपये मिळाले. राज्य सरकार या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि काळजी घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे."
आश्रमशाळांमधील गैरकारभारावर बोट ठेवत त्यांनी पुढे लिहिले, "जेव्हा दुर्लक्ष, देखभालीचा अभाव आणि गैरव्यवस्थापनामुळे या निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या हातात फक्त २ लाख रुपये टेकवले जातात. कदाचित काही राजकारणी आपल्या पाळीव प्राण्यांवर एका वर्षात करतात, त्यापेक्षाही हा खर्च कमी असेल."
शेवटी सरकारला थेट जाब विचारत दिपके यांनी सवाल उपस्थित केला, "राज्य सरकारच्या दृष्टीने एका आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवाची किंमत एवढीच आहे का?" या ट्विटने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आश्रमशाळांमधील गैरव्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, केवळ दोन लाखांची मदत देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत आश्रमशाळांमधील मृत्यूंची संख्या वाढली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य, पोषण आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये निदर्शनास आले आहे. अभिजित दिपके यांच्या ट्विटनंतर आता या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच, पीडित कुटुंबांना अधिक नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोहीम सुरू केली आहे.
आश्रमशाळांमध्ये २ वर्षांत ५९०+ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू
नुकसानभरपाई फक्त २ लाख रुपये
अभिजित दिपकेंची सरकारला टीका
काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर करतात त्यापेक्षाही हा खर्च कमी'
'आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत एवढीच?'

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.