⚡ ब्रेकिंग News

उल्हासनगरमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी भरदिवसा बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण; अवघ्या आठ तासात पोलिसांची कारवाई, एकाला अटक

रिव्हॉल्व्हरचा धाक, गाडी बदलून पळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अपहरण नाट्याचा छडा

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

उल्हासनगर  - उल्हासनगरमधील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी भरदिवसा अपहरण करण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांच्या विशेष पथकाने व्यावसायिकाची सुटका करून एका आरोपीला अटक केली. मॉर्निंग वॉकवरून परतत असताना बांधकाम व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे बंदूकीच्या धाकाखाली अपहरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ तासांत पोलिसांनी या हाय-प्रोफाईल अपहरणाचा छडा लावत त्यांची सुखरूप सुटका केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अपहरणामागील सूत्रधारांचा शोध पोलिसांसाठी आव्हानात्मक बनला आहे.

उल्हासनगरमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि इस्टेट एजंट जयराम नेहलानी यांचे सोमवारी सकाळी भरदिवसा अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम नेहलानी हे सोमवारी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प-२ मधील गोल मैदानावर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. वॉक पूर्ण करून ते घरी जाण्यासाठी मैदानाच्या गेटबाहेर आले, तेव्हा चार ते पाच आरोपी त्यांची वाट पाहत उभे होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. त्यांनी नेहलानी यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध केला असता, एका आरोपीने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली आणि डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत डांबून आरोपी तिथून पसार झाले.

भर दिवसा आणि रहिवासी भागात घडलेल्या या घटनेची दखल काही नागरिकांनी घेतली आणि त्यांनी तात्काळ उल्हासनगर पोलिसांना याची माहिती दिली. या अपहरणानंतर आरोपींनी नेहलानी यांच्या मुलाला फोन करून सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष आव्हाड आणि गुन्हे शाखेचे प्रमुख दिलीप गज्जर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी केली आणि आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांची घेराबंदी वाढत असल्याचे पाहून आरोपींनी स्कॉर्पिओ गाडी सोडून दिली आणि नेहलानी यांना दुसऱ्या वाहनात (वॅगनआर) हलवले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींनी केलेल्या फोन कॉलच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पडघा-टिटवाळा रस्त्यावरील एका गावातून जात असताना एका स्थानिक नागरिकाने नेहलानी यांना वॅगनआरमध्ये जबरदस्तीने बसवून नेले जात असल्याचे पाहिले आणि त्याने तात्काळ पोलिसांना कळवले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पडघा-टिटवाळा मार्गावरील गावांचे नेटवर्क सक्रिय केले आणि नेहलानी यांचा फोटो तसेच संशयित वाहनाची माहिती ग्रामस्थांना दिली. संशयित वॅगनआर दिसताच स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग केला आणि पोलिसांना त्याची लोकेशन कळवली. अखेर सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडवली रेल्वे स्थानकाजवळून नेहलानी यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणात अनिल जगताप नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे, जो कल्याणचा राहणारा असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.

आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी वाहनाची नंबर प्लेट बदलल्याचा संशय आहे. या अपहरणामागे एखादी गुन्हेगारी टोळी आहे की व्यावसायिक वैमनस्य, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती पोलीस अधीक्षकांकडून लवकरच देण्यात येईल, असे संकेत आहेत.

उल्हासनगरातील बांधकाम व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे भरदिवसा अपहरण.

मॉर्निंग वॉकवरून परतताना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण

आरोपींनी नेहलानी यांच्या मुलाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली

पोलिसांनी ८ विशेष पथके तयार करून तपास सुरू केला

आरोपींनी पोलिसांना चकवण्यासाठी वाहन बदलले, पण सीसीटीव्ही आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी खडवली येथून नेहलानी यांची सुटका केली

प्रकरणात अनिल जगताप या एका आरोपीला अटक

अपहरणामागील सूत्रधारांचा शोध सुरू





Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...