क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
नागपूर - सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) मोठ्या चिंतेत आहेत. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही चांगला पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची खरीपाची पिके वाया चालली आहेत. अशातच नागपूर वेधशाळेने (Nagpur Meteorological Centre) काल मध्यप्रदेशच्या वर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज उत्तरेकडे सरकल्याने अमरावती व गोंदिया जिल्ह्यासाठी जाहीर केलेला ऑरेंज अलर्ट काढून यलो अलर्ट घोषित केला आहे .
आजच्या नवीन अंदाजानुसार विदर्भात नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्याने या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे . सध्या विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही भागात अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे . हवामान विभागाच्या वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसाची स्थिती बदलली आहे . मात्र, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा होती, जी आता पूर्ण होताना दिसत नाही.
विदर्भावर यंदा पावसाचे मोठे संकट ओढवले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५८ टक्के कमी पाऊस झाला असून, गेल्या दशकातील ऑगस्ट महिन्याची ही सर्वांत कमी सरासरी नोंद ठरली आहे . विदर्भात ऑगस्ट महिन्यात साधारणपणे २९७.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात केवळ १२५.५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल १७१.६ मि.मी.ची तूट निर्माण झाली आहे .
ऑगस्टमधील पावसाची स्थिती जिल्हानिहाय पाहता अकोला जिल्ह्यात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती आहे. अकोल्यात ऑगस्टमध्ये केवळ ३३.५ मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत तब्बल ८४ टक्के तूट आहे .
अमरावतीत ४६.४ मि.मी. (-८२ टक्के)
यवतमाळमध्ये (-७८ टक्के)
नागपुरात ८३.६ मि.मी. (-७१ टक्के)
वाशिममध्ये (-७१ टक्के) पावसाची तूट नोंदली गेली .
राज्यात १ जून ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत पावसाची सुमारे १४.७ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे . राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे . विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाअभावी पिके करपू लागली आहेत .
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश असून मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच या भागात पावसाची तूट निर्माण झाली होती . राज्यातील १९ जिल्ह्यांत २० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आहे, तर ८ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी तूट आहे . त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडले असून सप्टेंबर महिन्यात दिलासादायक पाऊस होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .
पावसाअभावी शेतकऱ्यांची उभी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व महापूर आणि आता पावसाची दडी, यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा जळगाव जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. पुढील काळात चांगला पाऊस होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या घाईघाईने पेरण्या केल्या. मात्र, पीक उगवणीनंतर पिकांच्या वाढीसाठी लागणारा पाऊसच न झाल्याने, अनेक भागात हलक्या जमिनीतील पिके सुकू लागली आहेत. तर भारी जमिनीतील पिकांची वाढ खुंटल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, मका यासारखी पिके पावसाच्या अभावी आता कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रदेशात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे . बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील बहुतांश भागांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे . मात्र, या दरम्यान सर्वदूर पावसाचा अभाव राहिल्यास पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता फारच कमी आहे .
पावसाचा जोर वाढल्यास ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळेल, असेही अभ्यासकांचे मत आहे . मात्र, मराठवाड्यात ऑगस्टमध्ये सरासरी १७० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ५६.५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे ११४ मिलिमीटरची तूट नोंदली गेली . काही भागांत सलग ३१ दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, उडीद, बाजरी आणि ज्वारीसारख्या खरीप पिकांवर परिणाम झाला आहे .
विदर्भात ऑगस्ट दशकातील सर्वांत कोरडा - ५८ टक्के पावसाची तूट
अकोल्यात ८४ टक्के तूट - ऑगस्टमध्ये केवळ ३३.५ मिमी पाऊस
राज्यात २८ जिल्ह्यांत पावसाची कमतरता - १५ जिल्ह्यांत ७५% पेक्षा कमी पाऊस
ऑरेंज अलर्ट काढून यलो अलर्ट - विदर्भात हलका पाऊस
पिके करपू लागली - उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, मक्यावर परिणाम
सप्टेंबरच्या सुरुवातीला दिलासा मर्यादित - मुख्य पावसाळा संपण्याची चिंता

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.