‘राजीनामा घेतला कारण पुरावे सापडले होते का?’; फडणवीस म्हणाले, ‘असं नाही, पण…’
महिला आयोगाच्या अध्यक्षेचा आरोपीशी जवळचा संबंध, न्याय होणार नसल्यानेच राजीनामा – मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचा इशारा
नागपूर: भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे प्रचंड टीकेच्या धनी झालेल्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेण्यात आला का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
पुराव्यांबाबत फडणवीस काय म्हणाले?
रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, रुपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या त्यांच्याविरोधात काही पुरावे मिळाले होते का?
यावर मुख्यमंत्री म्हणाले, “असं नाही. शेवटी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध आहे किंवा त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलं आहे. अशा परिस्थितीत या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही, हे त्यांनीही मान्य केलं आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.”
‘राजीनामा टाळण्यासाठी केली होती धडपड’
यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यावेळी त्यांनी या मागण्यांकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र, अशोक खरात प्रकरणाने नाईलाजाने का होईना पण त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागले. हे पद वाचवण्यासाठी आणि राजीनामा टाळण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत धडपड केल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता.
‘अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही’
अशोक खरात प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “आपल्या कथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणे यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करेल.”
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण कोणी अशोक खरात यांना फक्त भेटलंय म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन
सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये महिला एकदम पुढे येत नसल्याचे निरीक्षण फडणवीस यांनी नोंदवले. ते म्हणाले, “पीडित महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीप्रमाणात महिला याला प्रतिसाद देत आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरू आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.”
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.