अशोक खरात प्रकरणात नवा वाद; ‘तृप्ती-चाकणकर यांच्यात कोट्यवधींची डील’, ठोंबरेच्या आरोपावर देसाईंचे स्पष्टीकरण
ठोंबरे यांचा दावा – ‘तृप्तीकडे होते व्हिडिओ पुरावे, पण सेटलमेंटमुळे दाबले गेले’; तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘बदनामीचा प्रयत्न, आम्ही चळवळीच्या कार्यकर्त्या’
पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांनी आधीच गाजलेल्या प्रकरणात आता राजकारण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत असून, आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रूपाली ठोंबरे पाटील यांनी तृप्ती देसाई आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात कोट्यवधींच्या डीलचा दावा केला आहे.
ठोंबरे यांचा काय दावा?
रूपाली ठोंबरे पाटील यांच्या आरोपानुसार, अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ पुरावे तृप्ती देसाई यांच्याकडे आधीपासूनच होते. मात्र, हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याऐवजी देसाई यांनी चाकणकर यांच्याशी तडजोड केली. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही ठोंबरे यांनी केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी ही सेटलमेंट करण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तृप्ती देसाई यांचे स्पष्टीकरण
तृप्ती देसाई यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत आणि प्रामाणिकपणे महिलांच्या मुद्द्यांवर काम करतो. अशा पद्धतीने आरोप करणे म्हणजे बदनामी करण्यासारखे आहे.
देसाई म्हणाल्या, “काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना त्यातून प्रसिद्धी मिळते आहे. राहिला प्रश्न सेटलमेंट किंवा तडजोडीचा, तर ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. रुपाली चाकणकर ज्या पदावर होत्या, त्या राहिल्या नाही पाहिजेत, हे मी आधीच सांगितले होते. त्यांच्या चुका मी वेळेवर दाखवण्याचा प्रयत्न केला.”
एन्काऊंटरच्या बातमीने पोटात दुखतंय?’
आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर उपरोधिक टिप्पणी करताना देसाई म्हणाल्या, “अशोक खरातचा एन्काऊंटर होणार आहे, ही बातमी कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखत आहे. ज्या राजकीय महिलांकडे हे पेन ड्राईव्ह आले नाहीत, त्यांना त्रास होत असेल. पण माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे विश्वास ठेवून लोक माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्या माध्यमातून हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले गेले.”
‘चळवळीच्या कार्यकर्त्याची बदनामी’
पुढे बोलताना देसाई म्हणाल्या, “रुपाली चाकणकरांबरोबर तडजोड म्हणजे ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. अशा पद्धतीचे आरोप करणे म्हणजे एका चळवळीतील कार्यकर्त्याला बदनाम करण्यासारखे आहे. तुमच्याकडे हे प्रकरण आले नाही म्हणून तुम्हाला त्रास होत असेल. यापुढे खरात आणि त्याच्यासोबत असलेल्या, ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे.”
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.