रात्रीच्या अंधारात शिंदेंची खेळी! ठाण्यात घरात बोलावून केली ४ नगरसेवकांची 'एन्ट्री'; अकोल्यात ठाकरे गट फुटला
दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेऊन परतलेल्या एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरा ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांना पक्षात घेऊन महायुतीच्या ताकदीचे प्रदर्शन केले.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन परतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. रात्री उशिरा ठाण्यातील आपल्या निवासस्थानी एकनाथ शिंदेंनी अकोला महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांना शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करून घेतला. यामुळे अकोल्याच्या राजकारणात भूकंप झाला असून ठाकरे गटाची अकोल्यातील स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे.
एकनाथ शिंदे सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सव्वा तास चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर मंगळवारी रात्री उशिरा शिंदे ठाण्यात परतले. रात्री दोनच्या सुमारास ते ठाण्यातील आपल्या 'नंदनवन' या निवासस्थानी पोहोचताच अकोल्यातून आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांची त्यांनी भेट घेतली.
या वेळी अकोला महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे चारही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भारुका, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांचा समावेश आहे. या चार नगरसेवकांबरोबरच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले सहापैकी चार नगरसेवक शिंदे गटात गेल्याने आता अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाकडे केवळ दोन नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. शिवाय, महाविकास आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झालेल्या सुरेखा काळे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने अकोल्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर अकोल्यात मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.