जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न, 'आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?'
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडत भाजपने सत्ता काबीज केली. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदी विजयी झाल्या, तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजू भोसले यांनी विजय मिळवला. या नाट्यमय घडामोडींनंतर आता साताऱ्याच्या राजकारणात एकच प्रश्न उपस्थित झाला आहे आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे? शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आणि थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्या. या राजकीय खेळीमुळे महेश शिंदे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
'घरातलाच घाव' अशी चर्चा
जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी भाजपकडे तिकीट मागितले. भाजपने गेल्या काही वर्षांतील कामाचा विचार करत त्यांना संधी दिली. पण इथून पुढे सुरू झाला राजकीय खेळ. शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे स्वतः मैदानात उतरले आणि पत्नीला भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली. एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या पत्नीला थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान केले.
याच वेळी जिल्हा परिषद परिसरात हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता. पालकमंत्री शंभूराजे देसाई जखमी अवस्थेतही आपल्या सदस्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचवेळी त्यांना 'घरातलाच घाव' बसल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
कोण फुटले? कोण टिकले?
या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांनी पक्षादेश डावलत भाजपला मतदान केले. कोरेगाव कुमठे गटातील हणमंत जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारिका फाळके यांनी भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना मत दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनीही भाजपला पाठिंबा दिला. याशिवाय राष्ट्रवादीचे अनिल देसाई (माण) आणि संदीप मांडवे (खटाव) यांना पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून सकाळी अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेल्याने ते मतदान करू शकले नाहीत.
शिवसेना की भाजप की सत्ता?
या सगळ्या घडामोडींमुळे सध्या साताऱ्यात एकच चर्चा रंगली आहे आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे? शिवसेना की भाजप की फक्त सत्तेचे? एका बाजूला आमदार एका पक्षाचे, तर पत्नी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर सदस्य आणि सत्तेसाठी पक्षातीलच उमेदवार फोडले, नुसतेच फोडले नाहीत तर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष देखील आपल्या पत्नीला बनवले. यामुळे एकच प्रश्न उपस्थित झाला – हा राजकीय डाव होता की पक्षाशी गद्दारी?
आता पक्षश्रेष्ठी काय करणार?
या सगळ्या घडामोडींनंतर आता नजर लागली आहे ती पक्षश्रेष्ठींकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई या 'राजकीय बंडा' वर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार की नाही, आणि आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षाने कोणती भूमिका घ्यावी, यावरून पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत फुटलेले सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस:
लता कर्णे – (बुध, खटाव)
ऋतुजा जगताप – (फलटण)
कामेश कांबळे – (सातारा)
अनिल देसाई (माण) आणि संदीप मांडवे (खटाव) यांना पोलिसांनी जिल्हा परिषद परिसरातून सकाळी अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेले.
शिवसेना:
हणमंत जगदाळे – (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके – (सातारा रोड)
अंतिम मतसंख्या:
भाजप – ३३
शिवसेना / राष्ट्रवादी / स्वाभिमानी / काँग्रेस – ३०
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.