सुनिल तटकरे यांच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
‘लिंगपिसाट भोंदूबाबाच्या नादी लागून रक्ताचा अभिषेक केला का?’; सूरज चव्हाण यांनी प्रवीण ठाकूर यांचा व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले
मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या बोटाच्या जखमेचा फोटो शेअर करत नवा वाद उभा राहिला आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी हा फोटो शेअर करत ट्विट केले आहे. यावर अजित पवार गटाचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी व्हिडिओ शेअर करत पलटवार केला आहे.
लवांडे यांचा काय सवाल?
विलास लवांडे यांनी ट्विट करत सुनिल तटकरे यांचा बोटाला जखम असलेला फोटो शेअर केला. त्यांनी लिहिले, “सुनिल तटकरेसाहेब तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे? लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी, कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब.”
पुढे ते म्हणाले, “आपण ज्येष्ठ नेते आहात, बिनधास्त बोला साहेब. त्या अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तरी तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं खरं बोलाच! महाराष्ट्र वाट बघतोय.”
राष्ट्रवादीचा पलटवार; व्हिडिओच शेअर केला
विलास लवांडे यांच्या या ट्विटला अजित पवार गटाचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, “विलास लवांडे तुमची मानसिक अवस्था मी समजू शकतो. अफवा पसरवणे, बदनामी करणे हा तुमचा छंद आहे. तुम्ही कट कपट केले तरी राष्ट्रवादीत फूट पडणार नाही. अँड. प्रवीण ठाकूर यांचा हा व्हिडीओ तुमच्यासाठी.”
व्हिडिओत काय म्हणाले प्रवीण ठाकूर?
सूरज चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रवीण ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “२०२४ साली लोकसभा निवडणुकीला उभे असताना सुनिल तटकरे हे प्रचारासाठी सातजे येथे आले होते. त्यावेळी, मी आणि तटकरे यांची गाडी एका पुलाजवळ समोरासमोर आली. आम्ही दोघांनी भेटून चर्चा केली. त्यानंतर, सुनिल तटकरे गाडीत बसत असताना मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती.”
पुढे ते म्हणाले, “मी स्वत: तटकरे यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो, तिथं त्यांच्या जखमेवर उपचार करण्यात आले होते. याचा मी साक्षीदार आहे.”
दरम्यान, यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या अनामिका बोटाला झालेल्या जखमेचे फोटो शेअर करत काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता तटकरे यांच्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.