⚡ ब्रेकिंग News

ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन; खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक

ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचं निधन; खांद्याला खांदा लावून लढलेला सोबती गेला, छगन भुजबळांकडून शोक

मंडल चळवळीचे शिलेदार, मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्याची जालन्यात अखेर; रमजान ईद साजरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिला निरोप

जालना: ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते आणि मुस्लिम ओबीसी आरक्षणाच्या चळवळीतील अग्रगण्य नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचं आज दुपारी निधन झाले. जालना येथील राहत्या घरी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीवर शोककळा पसरली असून, नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

शब्बीर अन्सारी कोण होते?

शब्बीर अन्सारी यांनी सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला. पुढे ओबीसींच्या व्यापक चळवळीत सहभागी होत त्यांनी ओबीसींच्या न्याय आणि हक्कांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. नुकत्याच झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कालच कुटुंबीयांसोबत त्यांनी रमजान ईद साजरी केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांची प्रकृती खालावली.

अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कार

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री इशा नमाजनंतर ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर नमाज-ए-जनाजा अदा करून जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार (दफनविधी) करण्यात येतील.

ओबीसी नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

शब्बीर अन्सारी यांच्या निधनामुळे ओबीसी चळवळीचा एक शिलेदार हरपल्याची भावना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा शिलेदार हरपला. मंडल आयोग ओबीसी चळवळ आणि देशपातळीवरील ओबीसी चळवळ जगलेला अवलिया आज आपल्यातून निघून गेला. माननीय शब्बीर अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

छगन भुजबळ यांची भावनिक श्रद्धांजली

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाने मनाला चटका लागल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भुजबळ म्हणाले, “शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे.”

पुढे बोलताना त्यांनी अन्सारी यांच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.”

भुजबळ यांनी पुढे नमूद केले की, “‘मंडलनामा’ या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे.”

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...