⚡ ब्रेकिंग News

भाजपच्या रणनीतीने शिवसेना-राष्ट्रवादीला धक्का; पोलिसांच्या भूमिकेवरून पालकमंत्र्यांची नाराजी.

 
भाजपच्या रणनीतीने शिवसेना-राष्ट्रवादीला धक्का; पोलिसांच्या भूमिकेवरून पालकमंत्र्यांची नाराजी.

 महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थापनेनंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. केवळ २८ सदस्यांचे संख्याबळ असतानाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक राजकीय रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवत भाजपला सत्तेवर नेले. या विजयामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून, या निकालाचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

प्रिया शिंदे अध्यक्षा, राजू भोसले उपाध्यक्ष

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना (शिंदे गट) चे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप

या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

कॅबिनेट बैठकीत होणार नाराजी नोंद

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. या 'पळवापळवी'मुळे महायुतीतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतील 'इनसाईड स्टोरी'

सातारा जिल्हा परिषदेत महायुती एकत्र लढेल, अशी चिन्हे असताना भाजपकडून चर्चेची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीकडून मकरंद आबा पाटील यांच्यावर ही जबाबदारी होती. मात्र, जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांचे जिल्ह्यातील संबंध तितकेसे ठिक नव्हते. भाजपने चर्चेची जबाबदारी गोरे सोडून इतर कुठल्याही नेत्याकडे सोपवावी, ही शंभूराज आणि मकरंद पाटील यांची इच्छा होती. अशातच भाजपकडून यात कोणताही बदल न केल्याने या दोन्ही नेत्यांनी भूमिका घेत जिल्ह्यात भाजपला एकटे पाडले.

मागच्या दाराने रंगली खेळी

देसाई आणि पाटील यांनी शशिकांत शिंदेंना सोबत घेत स्पष्ट बहुमत एकवटले. मात्र, मागच्या दाराने भाजपने काही उमेदवारांशी संपर्क सुरूच ठेवला होता. शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी आपले सर्व सदस्य एकत्र निवडणुकीला आणले. मात्र, पालकमंत्र्यांना कळूही न देता पोलिसांनी गेम फिरवला. साध्यावेशात इतका बंदोबस्त होता की, कार्यकर्ता कोण आणि पोलिस कोण हे ओळखणे कठीण झाले होते.

भाजप मंत्र्यांची झटापट, पालकमंत्र्यांना जखम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका बड्या मंत्र्याने शंभूराज देसाई यांच्यासोबत हातात हात घालून असलेल्या उमेदवाराचा हात खेचला. या झटापटीत शंभूराज देसाईंच्या हाताला जखम झाली. त्यांना काही समजण्याआधीच पोलिस तिथे धावले. अशात तो उमेदवार गळाला लावण्यात यश आल्याने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांचा विजय झाला.

पुढील राजकीय दिशा काय?

या पळवापळवीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झाले आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्येच या निवडणुकीवरून टोकाचे वाद झाल्याने याचे पडसाद येणाऱ्या काळात साताऱ्यात पहायला मिळतील. सध्या साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळेल, यात शंका नाही. सर्वांचे लक्ष आता राज्य कॅबिनेट बैठकीकडे लागले असून, या बैठकीत नेमके काय निर्णय होतात आणि कोणती भूमिका घेतली जाते, यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...