सोने दर ४ हजारांनी घसरले, चांदीही ६ हजारांनी स्वस्त, आजचे दर किती?
जळगाव : गेल्या २४ तासात सोन्याच्या दरात ४ हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जळगावमधील सुवर्णनगरीवरही दिसून येत आहे. डॉलर इंडेक्स दिवसागणिक वाढत असताना रुपयाच्या नीचांकी पातळीवरील घसरणीमुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजचे सोने-चांदीचे दर किती?
काल (२० मार्च) जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे दर जीएसटी शिवाय १,४८,००० रुपये होते. आज त्यामध्ये ४ हजार रुपयांची घसरण होऊन हेच दर १,४४,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरातही ६ हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर २,३६,००० रुपयांवरून २,३०,००० रुपये प्रति किलो इतके खाली आले आहेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने-चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत.
आगामी काळात सोन्याचे दर कसे असतील?
बाजारात मंदीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी) जतीन त्रिवेदी म्हणाले, "महत्त्वाचे मॅक्रो संकेत अजूनही प्रतिकूल असल्याने बाजारातील वातावरण कमकुवत आहे. व्याजदर वाढलेले राहण्याची शक्यता आहे, तर सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याने महागाईची चिंता वाढत आहे आणि सोन्याच्या वाढीला मर्यादा येत आहेत. एकूणच, सोने अस्थिर आणि कमजोर राहण्याची शक्यता आहे."
नजीकच्या काळात सोन्याची ट्रेडिंग रेंज ₹१,४०,००० ते ₹१,४७,००० दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचा काय अंदाज?
एसएस वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा म्हणाल्या की, आज एमसीएक्सवर सोन्याच्या किमतींना प्रति १० ग्रॅम ₹१,७०,००० जवळ तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे, तर ₹१,६५,००० हा नजीकच्या काळासाठी एक महत्त्वाचा पिव्होट आहे. जोपर्यंत किमती या पातळीच्या खाली राहतील, तोपर्यंत बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि किमती प्रति १० ग्रॅम ₹१,३५,००० ते ₹१,२७,००० पर्यंत घसरू शकतात.
युद्धाचा परिणाम : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याचा परिणाम म्हणून अनेक देशांत सोने-चांदीमधील गुंतवणूक अन्य ठिकाणी वळवली जात असल्याचे मानले जात आहे. युद्धाची तीव्रता अजून वाढल्यास सोने आणि चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.