'सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु'; शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार फोडून अध्यक्षपदी प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना विजयी केले. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी शंभूराज देसाई यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना थेट इशारा दिला की, "या प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची युती करेल."
साध्या वेषातील पोलिसांनी भरली होती जिल्हा परिषद
शंभूराज देसाई म्हणाले, "सातारा जिल्हा परिषद साध्या वेषातील पोलिसांनी भरली होती. आमचे सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे यांचं आमच्याच सदस्यांनी अपहरण केल्याची खोटी तक्रार काल दाखल केली. बापूसाहेब शिंदे पोलीस स्टेशनला जाऊन पहाटे जबाब दिला. माझं कोणी अपहरण केलं नाही, मी पक्षासोबत असल्याचा जबाब त्यांनी दिला. यानंतर दुसरा गुन्हा सव्वा सहा वाजता दाखल केला, ज्यात आमच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांची नावं घातली. दोन सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला."
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप
शंभूराज देसाई यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर थेट आरोप केले. ते म्हणाले, "कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते, त्यांना मी आणि मकरंद आबा लिफ्टमधून वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्याला अडवलं. तो म्हणाला, 'मला बोलायचं नाही, मी आबांच्या आणि दादांच्या बरोबर जाणार आहे', एवढं स्पष्ट कामेश कांबळेनं सांगितलं तरी बाबांनी त्याला दम दिला."
पुढे बोलताना ते म्हणाले, "बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीशी संबंध नाही असे साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि फिरोज पठाण हा कार्यकर्ता होता. मी कामेशला मिठीत धरलं होतं, माझ्या मिठीतून सोडवून कामेशला उजव्या बाजूच्या वरांड्यात नेलं. मी आणि आबांनी त्यांच्या मिठीतून सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर घेऊन गेलो. आमच्या सदस्यांबरोबर आत जाऊन कामेश कांबळे आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले."
'पोलीस भाजपचे मांडलिक झाल्यासारखे वागले'
पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, "अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना वरच्या मजल्यावर घेऊन आल्यानंतर १०० साध्या वेषातील पोलीस लिफ्टबाहेर उभे होते. दरवाजासमोर दांडकी आडवी लावली. २५-३० पोलीस मागं ढकलत होते. सदस्यांना १०-१० पोलीस ओढत होते. दरवाज्यापर्यंत अनिल देसाई आणि संदीप मांडवेंना नेलं असता जादा पोलिसांना बोलावलं आणि आमच्या तावडीतून दोन सदस्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले. पोलीस भाजपचे मांडलिक झाल्यासारखं वागले आहेत."
'मंत्र्याला जखम केली, याचंही भान नाही'
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, "लोकांनी कौल आमच्याबाजूनं दिलेला, ३७ जागा विजयी झाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी होती. आमच्या दोन सदस्यांनी व्हीप मोडला, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी व्हीप मोडला, त्यांच्यावर कारवाई करू, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. मला एकच सांगायचं आहे आम्ही ३३ सदस्य तिथं निघालो होतो. मतदानासाठी दरवाज्यावर आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना तिथून ओढून नेलं. मंत्र्याला जखम होते, मंत्र्याला ओढता, याचंही भान नाही."
'सुरुवात भाजपनं केली, शेवट आम्ही करू'
समारोप करताना शंभूराज देसाई यांनी थेट इशारा दिला, "समारोप करताना मी एवढंच सांगेन, या प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेची युती करेल."
फुटलेल्या सदस्यांवर कारवाईचा इशारा
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटलेल्या सदस्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शंभूराज देसाई म्हणाले की, व्हीप मोडणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्यात येईल आणि यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचीही तयारी आहे.
पुढील राजकीय दिशा
शंभूराज देसाई यांच्या या इशाऱ्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महायुतीतील अंतर्गत वाद आता थेट उघड झाला असून, फुटलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली गेल्यास पुढील काळात या निवडणुकीचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपने मात्र आपली ही रणनीती यशस्वी ठरवत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.