⚡ ब्रेकिंग News

अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी; नाथाभाऊ म्हणाले - 'मी दुःखी'; 'भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरून आलेल्यांना काय माहित'

फडणवीस, शिंदे, महाजन अनुपस्थित; शरद पवारांची खास हजेरी; 'पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण यात मोठा फरक' - खडसेंची खंत

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

जळगाव / मुक्ताईनगर - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा नुकताच अमृत महोत्सवानिमित्तचा कार्यक्रम मुक्ताईनगर येथील कोथळी गावात मोठ्या उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांसह राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते . मात्र, भाजपाकडून मात्र एक-दोन नेते सोडले तर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खडसे यांनी भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल दुःख व्यक्त केले.

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये चार दशके घालवल्यानंतर २०२० मध्ये पक्ष सोडला होता . भाजपमधील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे खडसे यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर बोट ठेवले. "आज मला वेदना होते जेव्हा मी आजच्या राजकारणाची पूर्वीच्या राजकारणाशी तुलना करतो" , असे ते म्हणाले.

आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलावले होते . यातील अनेकांनी हजेरी लावली, मात्र भाजपमध्ये आपण चाळीस वर्षे काम केल्याने अनेक नेत्यांशी आपले घनिष्ट संबंध आजही कायम राहिले आहेत . ते येतील अशी अपेक्षा होती. मात्र, ते येऊ शकले नाहीत, याचे दुःख आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

"आता भाजपमध्ये ८० टक्के लोक हे अन्य पक्षांतून आले आहेत. त्यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना आमच्यासारख्या लोकांनी भाजप वाढवण्यासाठी काय मेहनत घेतली आहे, हे माहीत नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येईल?" असेही खडसे यांनी व्यक्त केले .

खडसे यांच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी दांडी मारली . विशेष म्हणजे, खडसे यांनी सर्वांना वैयक्तिकरिता निमंत्रणे दिली होती .

या अनुपस्थितीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, "विरोधी पक्षात असूनही, सत्ताधारी पक्षातील नेते नेहमी मला मदत करायचे. २०१४ पर्यंत, एक सुहार्दपूर्ण राजकीय वातावरण होते, जिथे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांना भेटायचे, शुभेच्छा द्यायच्या आणि टीका देखील करायचे. पण वैयक्तिक मतभेद कधीही आजच्या पातळीवर नव्हते. वैयक्तिक संबंध नेहमी टिकवले जात होते" .

या विधानातून त्यांनी भूतकाळातील 'वैयक्तिक संबंधांना महत्त्व' असलेल्या राजकारणाची आठवण काढताना, सध्याच्या 'व्यक्तिगत द्वेषा'च्या राजकारणाकडे बोट दाखवले.

भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र खास उपस्थिती लावली . आपल्या भाषणात खडसे यांनी शरद पवार यांचे आभार मानताना भावूक होऊन सांगितले, "राजकीय अडचणींच्या काळात आणि संकटसमयी शरद पवार यांनी मला साथ दिली व उजेडात आणले. त्यांनी वेळप्रसंगी आशीर्वाद दिले नसते, तर मी पडद्यामागे किंवा अंधारात फेकला गेलो असतो" .

गेली अनेक वर्षे आपण गोर-गरीब जनतेसाठी, समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे. यापुढेही तो कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपल्या वाढदिवसाला या दोन दिवसांत जेवढी गर्दी झाली, तेवढी गर्दी कोणत्याही सभेला किंवा वाढदिवसाला झाल्याचे कधी पाहायला मिळाले नव्हते . तो प्रतिसाद आज पाहायला मिळाला आहे, असे खडसे म्हणाले.

यंदा अनेक भागात अद्यापही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत . या आठवड्यात पाऊस येईल, असा अंदाज आहे; तो आला तर आनंद आहे. मात्र, नाही आला तर सरकारने पुढे येऊन अशा शेतकऱ्यांना मदत करायला हवी . अनेक शेतकरी पाऊस नसल्याने आपली शेती नांगरून टाकण्याच्या विचारात आहेत . काही जण आत्महत्या करू शकतात, हे पाहता सरकारने मदत करायला हवी, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे यांचे त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे . सरकार आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यातून तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे .

अमृत महोत्सवी सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी: फडणवीस, शिंदे, महाजन अनुपस्थित.

खडसेंची खंत: 'भाजप वाढवण्यासाठी आम्ही केलेली मेहनत बाहेरून आलेल्यांना कळत नाही.'

पूर्वीचं राजकारण वेगळं होतं': वैयक्तिक संबंध टिकवणाऱ्या भूतकाळी राजकारणाची आठवण.

शरद पवारांची उपस्थिती: खडसेंनी पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य: पावसाअभावी शेतकऱ्यांची अडचण, सरकारने तातडीने मदत करावी.

मनोज जरांगे आंदोलन: चर्चेतून तोडगा निघेल, अशी अपेक्षा.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...