⚡ ब्रेकिंग News

'प्रीपोल अलायन्स भाजपसोबत होता, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो'; कामेश कांबळे फडणवीसांना भेटल्याचा दावा; शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड.

 'प्रीपोल अलायन्स भाजपसोबत होता, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो'; कामेश कांबळे फडणवीसांना भेटल्याचा दावा; शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड.

कोरेगावात भाजपसोबत निवडणूकपूर्व युती, कामेश कांबळे देवेंद्र फडणवीसांना भेटले, पालकमंत्र्यांनी सायरन का वाजवला? महेश शिंदेंचा सवाल, शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केल्यानंतर आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका होत होती. आता महेश शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी कोरेगावात भाजपसोबत निवडणूकपूर्व युती असल्याचे सांगतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

प्रीपोल अलायन्स भाजपसोबत होता

महेश शिंदे म्हणाले, "जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महायुतीच्या झालेल्या बैठकीमध्ये युतीच्या बाबत ज्या त्या आमदाराने त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता. मी माझ्या मतदारसंघांमध्ये युतीमधील दोन्ही पक्षांशी चर्चा केली परंतु एका पक्षाने (राष्ट्रवादीने) स्पष्ट नकार दिला होता."

ते पुढे म्हणाले, "त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत माझ्या मतदारसंघातील एकूण सात पैकी ४ जागा शिवसेना आणि ३ जागा भाजप लढवणार असं ठरलं होतं. प्रीपोल अलायन्स भाजपसोबत असल्यानं त्यांच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्यच होतं."

शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड

महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर विशेष टीका केली. ते म्हणाले, "शशिकांत शिंदे हे माझे बांधावरचे दुश्मन नाहीत. पण ते आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत कोणत्या तोंडाने जाऊ शकतो?"

ते पुढे म्हणाले, "शशिकांत शिंदे हे त्यांची तुतारी विसरून घड्याळाकडे गेले आहेत याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत आहे. त्यांनी एकदा भूमिका जाहीर केली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत ही भूमिका त्यांनी आता जाहीर केली पाहिजे."

कामेश कांबळे फडणवीसांना भेटले'

महेश शिंदे यांनी मोठा दावा करताना सांगितले, "राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे दोन दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटून 'आम्ही तुमच्या सोबत आहोत, मी शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता आहे' हे सांगून आले होते. त्यांनी मला महायुतीमध्ये राहायचं आहे, महाविकास आघाडीमध्ये नाही जायचं, हे मुख्यमंत्र्यांसमोर मुंबईमध्ये सांगितलं होतं."

पालकमंत्र्यांनी सायरन का वाजवला?

महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "कामेश कांबळेला आणताना पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आले आहेत. कामेश कांबळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून सुद्धा शिवसेनेचे पालकमंत्री सायरन लावून त्यांच्या गाडीतून त्याला घेऊन येत आहेत. त्यामुळे दहशत कोणी केली, शांतपणे अभ्यास करा. हाणामारी करण्यासाठी चार हजार लोक बोलवले."

पालकमंत्र्यांची चिडचिड'

महेश शिंदे पुढे म्हणाले, "पालकमंत्र्यांची लोक त्यांच्याबरोबर राहिली नाहीत. पालकमंत्र्यांचा प्रीपोल अलायन्स राष्ट्रवादीबरोबर होता म्हणून ते त्यांच्यासोबत गेले. आमचा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर होता म्हणून आम्ही भाजपबरोबर राहिलो. सभागृहामध्ये शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेचं संख्याबळ त्यांच्याबरोबर राहिले परंतु राष्ट्रवादीचे संख्याबळ राहू शकले नाही याची चिडचिड पोलिसांबरोबर करणे चालत नाही."

'एकनाथ शिंदेंशी चर्चा केली'

आपली भूमिका स्पष्ट करताना महेश शिंदे म्हणाले, "मला एकनाथ शिंदे यांनी बोलवून माझ्या भूमिकेबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना स्पष्ट केलं होतं की मी भाजपबरोबर लढलो आहे, आमची प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर आहे. दुसऱ्या पक्षाबरोबर आम्ही अलायन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला फार किंमत दिली नाही."

जिल्हा बँक निवडणूकही भाजपसोबत

महेश शिंदे यांनी येत्या जिल्हा बँक निवडणुकीबाबतही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून लढवावी असे स्पष्ट केलेलं आहे. मी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार आहे. ज्याला बरोबर यायचं त्यांनी या, नाहीतर नाही. माझा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाऊनच ही निवडणूक लढणार, यात काही शंका नाही."

शशिकांत शिंदे जिथे गेले तिथे शेवट'

महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हटले, "शशिकांत शिंदे जिथे जातात तिथे त्यांचा शेवट होतो. आजपर्यंत तुम्ही बघितला आहे, जिथे ते गेले, गुलाल उधळला तिथं बुक्का तयार झाला आहे. काल सुद्धा तसंच झालं. शशिकांत शिंदे आले नसते तर इतरांचं भलं झालं असतं. महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही हे सगळ्यांचे ठरलं होतं. राष्ट्रवादीबरोबरचे उमेदवार फुटले ते शशिकांत शिंदे यांच्या येण्यामुळे फुटले."

पुढील राजकीय दिशा

महेश शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेने साताऱ्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. महायुतीतील अंतर्गत वाद आता थेट उघड झाला असून, येत्या जिल्हा बँक निवडणुकीत हे वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून अद्याप या आरोपांवर प्रतिक्रिया आलेली नाही

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...