खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले
नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी असलेले संबंध समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता त्यांच्या पक्षातील महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
भुजबळ काय म्हणाले?
रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, "संवैधानिक पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो."
'पीडित महिलांनी पुढे यावे'
भुजबळ यांनी या प्रकरणातील पीडित महिलांबाबतही भूमिका मांडली. ते म्हणाले, "ज्या महिलांवर अन्याय झाला असेल त्यांनी पुढे येऊन आपली तक्रार दिली पाहिजे. जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करून कारवाई करतील."
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा प्राप्त झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली होती. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे."
राजीनामा देतानाची पोझ चर्चेत
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका दमानिया म्हणाल्या, "राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण रुपाली चाकणकर या जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती, एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन (आत्मपरीक्षण) करण्याची गरज आहे."
सहआरोपी करा' अशी मागणी
दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे या प्रकरणाला आणखी एक नवा वळण मिळण्याची शक्यता आहे.
पुढील राजकीय दिशा
रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत आता सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशोक खरात प्रकरणातील तपास पुढे जात असताना, या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चाकणकर यांच्याकडून अद्याप या सर्व आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.