एचडीएफसी ते पंजाब नॅशनल बँकेसह विविध बँका; एटीएम कार्डच्या वापराचे नियम बदलणार, पैसे काढणं महागणार, जाणून घ्या नवी अपडेट
१ एप्रिलपासून लागू होणार नवे नियम; कमी होणार मोफत व्यवहारांची मर्यादा, वाढणार शुल्क; यूपीआय एटीएम व्यवहारही फ्री लिमिटमध्ये जोडले जाणार
मुंबई: भारतात नवं आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने एचडीएफसी बँकेसह पंजाब नॅशनल बँक, बंधन बँक आणि जिओ पेमेंट बँकेसह विविध बँका एटीएम कार्डच्या वापरासंदर्भातील नियम बदलणार आहेत. यामध्ये एटीएम कार्डवरून पैसे काढण्याचे नियम, मोफत व्यवहारांची मर्यादा आणि शुल्क यासंदर्भातील बदलांचा समावेश आहे.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक आता यूपीआय आधारित पैसे काढणे (UPI ATM Withdrawal) हे देखील मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेत जोडणार आहे. म्हणजेच यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास ते एटीएम व्यवहार मर्यादेशी जोडले जाईल. ही मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एटीएम व्यवहारावर शुल्क भरावे लागेल.
बँकेच्या नियमानुसार मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. एचडीएफसी बँकने महानगरांमध्ये (मेट्रो) मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा ३ व्यवहार ठेवली आहे. नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ वेळा एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डवरून पैसे मोफत काढता येतील. नवा नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनेही एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. हा नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
बँकेचे ग्राहक १ एप्रिलपासून एटीएम कार्डचा वापर करून एका दिवसात १ लाख रुपयांऐवजी ५० हजार रुपये काढू शकतील. हा नियम काही विशिष्ट डेबिट कार्डसाठी लागू असेल.
तसेच, रुपे सिलेक्ट डेबिट कार्ड, पीएनबी रुपे सिलेक्ट नियो, पीएनबी रुपे सिलेक्ट एक्सल, व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड, मास्टर डेबिट कार्ड आणि बिझनेस डेबिट कार्डची पैसे काढण्याची मर्यादा १ लाख ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
बंधन बँक
बंधन बँकेनेही डेबिट कार्डद्वारे मोफत पैसे काढण्याची संख्या कमी केली आहे. आता ग्राहक बंधन बँकेच्या एटीएमद्वारे ५ वेळा मोफत पैसे काढू शकतील. इतर बँकांच्या एटीएममधून ३ वेळा मोफत पैसे काढता येतील. मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर २३ रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.
जिओ पेमेंट बँक
जिओ पेमेंट बँक देखील क्यूआर आधारित पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. याद्वारे ग्राहक यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही बँक प्रतिनिधीकडे यूपीआयचा वापर करून व्यवहार प्रमाणित करून पैसे काढू शकतील.
या सर्व बदलांमुळे ग्राहकांना एटीएमचा वापर करताना अधिक खर्चिक पर्यायांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेचे नवे नियम वेळीच समजून घेऊन त्यानुसार व्यवहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.