⚡ ब्रेकिंग News

"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; 'अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो'


 "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; 'अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो'

'तर्काला तिलांजली देऊन कुठल्यातरी अजब तीर्थासाठी खरातसारख्याच्या भजनी लागतात', सत्ताधाऱ्यांच्या धोबीपछाड राजकारणावर टीका; 'प्रकरण बासनात गुंडाळलं तर महाराष्ट्राचं वाटोळं'

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात  प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी सत्ताधारी आणि राजकीय व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली आहे. 'खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो, हे पाहून महाराष्ट्राचे अधःपतन झाल्याची भीती वाटते,' अशा भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला.

'कुठल्या अजब तीर्थासाठी खरातच्या भजनी लागलात?'

राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा दाखला दिला. ते म्हणाले, "जिथे लोकमान्य टिळक 'गीतारहस्य' लिहितात आणि यशवंतराव चव्हाणांसारखे नेते तर्कतीर्थांशी संवाद साधतात, त्याच महाराष्ट्रातले आजचे नेते तर्काला तिलांजली देऊन कुठल्यातरी अजब 'तीर्था'साठी खरातसारख्याच्या भजनी लागतात, हे भीषण आहे."

ते पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित करणाऱ्या आमदारांपैकीच काही जण या प्रकरणात अडकले असण्याची शक्यता आहे. "हा मोठा विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे," असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांच्या 'धोबीपछाड' राजकारणावर ताशेरे

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, "आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदाच्या हव्यासापोटी नेते इतके अंध झाले आहेत की, चमत्काराची खात्री देणाऱ्या कोणाच्याही पायी ते लीन होतात."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हे प्रकरण आम्हीच उघडकीस आणले' असे म्हटल्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी सवाल केला की, "हे सर्व घडत असताना तुमच्याच घटक पक्षातील नावांभोवती संशयाची सुई असताना तुम्हाला सुगावा का लागला नाही?"

'प्रकरण बासनात गुंडाळलं तर महाराष्ट्राचं वाटोळं'

राज ठाकरे यांनी पुढे गंभीर इशारा देत म्हटले की, हे प्रकरण केवळ कोणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी वापरले जात असल्याची चर्चा कानावर येत आहे.

त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, "जर समोरच्याने शरणागती पत्करली आणि हे प्रकरण बासनात गुंडाळले गेले, तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले म्हणून समजा."

मुख्यमंत्र्यांना सुनावले

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले की, "धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही."

प्रमुख मुद्दे 

राज ठाकरेंची टीका: 'खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो'

महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला: 'तर्काला तिलांजली देऊन कुठल्यातरी अजब तीर्थासाठी खरातच्या भजनी लागतात'

सत्ताधाऱ्यांवर निशाणा: 'आमदारकी-मंत्रीपदाच्या हव्यासापोटी नेते अंध झाले'

फडणवीसांना सवाल: 'तुमच्याच घटक पक्षातील नावांभोवती संशयाची सुई असताना सुगावा का लागला नाही?'

गंभीर इशारा: 'प्रकरण बासनात गुंडाळलं तर महाराष्ट्राचं वाटोळं'

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...