⚡ ब्रेकिंग News

गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला; ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट


  गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला; ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट

शहरी भागात २५ दिवसांचे अंतर कायम; साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचा निर्णय; पुरवठा सुरळीत असल्याचा हरदीप पुरी यांचा दावा

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम भारतीय स्वयंपाकघरांवर होत असतानाच केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता ४५ दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात २५ दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली.

ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळे नियम

यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी २१ दिवसांचा कालावधी होता, जो अलीकडे २५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना ४५ दिवसांनंतर दुसऱ्या सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.

अफवांमुळे वाढली होती घाईघाईची बुकिंग

गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच सिलेंडर बुक करू लागले होते. पूर्वी सुमारे ५५ दिवसांनी सिलेंडर बुक करणारे ग्राहक आता फक्त १५ दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागल्याने साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता वाढली होती. या पार्श्वभूमीवर बुकिंगमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

संसदेत हरदीप पुरी यांची माहिती

लोकसभेत बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. जगात ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत असून देशातील ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

एलपीजी संकटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना पुरी यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ३३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी उपस्थित केला मुद्दा

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजीबाबत चिंता व्यक्त करत रेस्टॉरंट बंद होत असल्याचे आणि लहान व्यापाऱ्यांवर परिणाम होत असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हा अफवा पसरवण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा काळ नाही, आणि देशात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...