⚡ ब्रेकिंग News

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात, 'आम्ही आमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहोत'; इराणच्या तीन सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूची पुष्टी.

 अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात, 'आम्ही आमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहोत'; इराणच्या तीन सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूची पुष्टी.

इराण-इस्त्रायल युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले, 'आम्ही इराणचं संपूर्ण लष्कर उद्ध्वस्त केलंय'

तेहरान / वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धासंदर्भात एक मोठे विधान केले आहे. आम्ही इराणचे संपूर्ण लष्कर उद्ध्वस्त केल्याचा दावा करत त्यांनी आपली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ असल्याचे स्पष्ट केले आहे. या विधानामुळे इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इराणच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा खात्मा?

दरम्यान, इस्रायलने इराणच्या तीन सर्वोच्च नेत्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांचा समावेश असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी खुद्द इराणने केली आहे. तसेच दिवसभरात इस्रायलकडून इराणच्या तीन प्रमुख शिलेदारांच्या खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मेहदी रस्तामी शमस्तान (इराण गुप्तचर मंत्रालयातील महत्त्वाचे कमांडर), इस्माईल अहमदी (इराणच्या बसीज फोर्सच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख) तसेच इतर अनेक वरिष्ठ कमांडर यांचा समावेश आहे. तेहरानच्या मध्यभागी बसीज फोर्सच्या वरिष्ठ नेतृत्वावर करण्यात आलेल्या हल्ल्यात या कमांडरना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरील पोस्ट चर्चेत

मध्य पूर्वेतील सर्व देशांना ट्रम्प यांच्याकडून युद्धाचे आमंत्रण देण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "मध्यपूर्वेतील इराणच्या दहशतवादी राजवटीच्या संदर्भात आमच्या महान लष्करी मोहिमा संपवण्याच्या दिशेने विचार करताना आम्ही आमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहोत."

ट्रम्प यांनी ठरवलेली सहा उद्दिष्टे

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराणविरोधातील सहा प्रमुख उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत:

१. इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व काही पूर्णपणे नष्ट करणे.

२. इराणचा संरक्षण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करणे.

३. विमानविरोधी शस्त्रास्त्रांसह त्यांचे नौदल आणि हवाई दल संपुष्टात आणणे.

४. इराणला अण्वस्त्र क्षमतेच्या जवळपासही फिरकू न देणे; अशी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका त्वरित व शक्तिशालीपणे प्रतिसाद देण्याच्या स्थितीत सदैव राहणे.

५. इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतरांसह आमच्या मध्यपूर्वेतील मित्र देशांना सर्वोच्च पातळीवर संरक्षण देणे.

६. होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण आणि गस्त ती वापरणाऱ्या इतर देशांनी, आवश्यकतेनुसार, करणे आवश्यक आहे — अमेरिका हे करत नाही! विनंती केल्यास आम्ही या देशांना होर्मुझसंदर्भात मदत करू, परंतु इराणचा धोका संपुष्टात आल्यावर ते गरजेचे राहणार नाही. इतर देशांसाठी ही एक सोपी लष्करी कारवाई असेल."

होर्मुझचे रक्षण करण्याचे आवाहन

होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार इतर देशांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे. "होर्मुझचे रक्षण आणि गस्त ती वापरणाऱ्या इतर देशांनी करणे आवश्यक आहे. विनंती केल्यास आम्ही मदत करू, परंतु इराणचा धोका संपुष्टात आल्यावर ते गरजेचे राहणार नाही," असे ते म्हणाले.

युद्धाचा निर्णायक टप्पा?

ट्रम्प यांच्या या विधानानंतर इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध आता शेवटच्या टप्प्यात आले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर या युद्धाचे गंभीर परिणाम होत असून, ऊर्जा संकट अधिक गडद होत आहे. अशातच ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्य-पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...