तब्बल ४०० खेळाडूंची लढत ; तीन वेळची विजेती भाग्यश्री फंड ठरणार प्रमुख आव्हान
सोलापूर क्रांती न्यूज - प्रतिनिधी / पुणे:
महिला कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २८ आणि २९ मार्च रोजी सोलापूर शहरात चौथ्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर करणार आहे.
सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेत राज्यातील ४२ जिल्ह्यांच्या ४०० हून अधिक महिला कुस्तीपटू आपले बळ आजमावणार आहेत. स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संस्थापक सौ. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस आणि सरचिटणीस योगेश दोडके उपस्थित होते.
वजनी गट आणि बक्षिसे:
स्पर्धेसाठी एकूण १० वजनी गट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच 'महाराष्ट्र केसरी' गट (६५ ते ७६ किलो) यांचा समावेश आहे. प्रत्येक वजनी गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात येईल. तर अंतिम लढतीत विजय मिळवून 'महाराष्ट्र केसरी'चा मान मिळवणाऱ्या महिला कुस्तीपटूवर मानाच्या गदेचा मानाचा वर्षाव केला जाणार आहे.
भाग्यश्रीकडून हैटट्रिकचा प्रयत्न:
महाराष्ट्र केसरीच्या या हंगामात सर्वांच्या नजरा तीन वेळच्या विजेती भाग्यश्री फंड हिच्यावर असतील. तिने आतापर्यंत ही मानाची गदा तीन वेळा पटकावली असून यंदा चौथ्यांदा हा किताब आपल्या नावे करण्याचा तिचा प्रयत्न असेल. तिच्याशी स्पर्धा करण्यासाठी अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले, वेदांतिका पवार यांसारख्या आघाडीच्या कुस्तीपटू मैदानात उतरणार आहेत. गतवेळच्या अंतिम लढतीत भाग्यश्रीने अमृताचा पराभव केला होता. भाग्यश्रीच्या कारकिर्दीकडे पाहता तिने स्पेनमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून थायलंडमध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
पाहुण्यांच्या भेटीवर भर:
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, "पुरुषांच्या महाराष्ट्र केसरीप्रमाणेच महिला स्पर्धेनेही आता राज्यात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून मी या उपक्रमासाठी नेहमीच पाठीशी राहीन."
आखाड्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा प्रयत्न:
निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या की, "सोलापूर जिल्ह्यात कुस्तीचे प्रचंड पारंगत्व आहे; परंतु आधुनिक सुविधा आणि चांगल्या स्पर्धांच्या अभावी खेळाडू मागे राहतात. हे अंतर कमी करण्यासाठी आम्ही फाउंडेशनतर्फे नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे स्थानिक महिला कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळेल."
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.