१९व्या शतकातील बंगालची भयानक कथा; तृप्ती डिमरीचा दमदार अभिनय
मुंबई: अनेकदा काही चित्रपट असे असतात जे पाहिल्यानंतर ते मनात कोरले जातात. असाच एक हॉरर चित्रपट म्हणजे 'बुलबुल'. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे. अवघ्या १ तास ३४ मिनिटांचा हा चित्रपट भीती, सस्पेन्स आणि दमदार कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
१९व्या शतकातील बंगालमधील भयानक कथा
'बुलबुल' हा पीरियड हॉरर ड्रामा चित्रपट १९व्या शतकातील बंगाल प्रेसीडेंसीतील एका गावाची कथा सांगतो. लहान वयातील एका मुलीचं लग्न तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या श्रीमंत जमीनदार इंद्रनीलसोबत लावलं जातं. त्या मुलीची मैत्री इंद्रनीलचा लहान भाऊ सत्यासोबत होते. सत्या तिला लहानपणी भूत-प्रेतांच्या आणि चेटकिणींच्या गोष्टी सांगत असतो. २० वर्षांनी दोघे मोठे होतात, मात्र इंद्रनीलला आपल्या पत्नी बुलबुल आणि सत्या यांच्यातील जवळीक खटकू लागते. त्यानंतर तो सत्याला शिक्षणासाठी लंडनला पाठवून देतो.
इथून सुरू होतो खरा थरार
सत्या लंडनला गेल्यानंतर इंद्रनील आपल्या पत्नीवर अत्यंत अमानुष अत्याचार करतो. मारहाणीत तिच्या पायांच्या हाडांचा चुराडा होतो. त्यानंतर इंद्रनीलचा मानसिकदृष्ट्या अस्थिर जुळा भाऊ महेंद्र बुलबुलवर अत्याचार करतो. या क्रूरतेमुळे तिचा मृत्यू होतो आणि पुढे ती एक भयावह चेटकीण बनते. यानंतर ही चेटकीण एक-एक करून त्या सर्व लोकांना संपवू लागते, ज्यांनी महिलांवर किंवा लहान मुलींवर अत्याचार केलेले असतात.
नेटफ्लिक्सवर उपलब्ध
हॉरर, सस्पेन्स आणि समाजाला विचार करायला लावणारा संदेश देणारा 'बुलबुल' चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. यात अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने बुलबुलची भूमिका साकारली असून तिच्यासोबत अविनाश तिवारी, पाओली दाम, राहुल बोस आणि परमब्रत चट्टोपाध्याय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटाला IMDb वर ६.६ रेटिंग मिळाले असून सध्या तो पुन्हा एकदा ओटीटीवर ट्रेंड होत आहे. हॉरर आणि सस्पेन्स चित्रपट आवडणाऱ्यांसाठी 'बुलबुल' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.