शिंदेंनी सातारा एसपीवर केले गंभीर आरोप; 'लोकशाहीचा खून' म्हणत मांडली भूमिका, फडणवीस म्हणाले - वस्तुस्थितीची चौकशी होईल
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादळ आणि तेथील पोलीस अधीक्षकांच्या कारवाईचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात साताऱ्यातील घटनेची सविस्तर माहिती देताना प्रशासनावर गंभीर आरोप केले. मात्र, ते माहिती सांगत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाले आणि एका वाक्यात वादावर पडदा टाकल्याचे पाहायला मिळाले. याआधी विधानपरिषदेत सातारा एसपींच्या निलंबनाच्या निर्णयावरूनही जोरदार धक्काबुक्की झाली.
शिंदेंचा पोलीस प्रशासनावर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत साताऱ्यातील घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "या प्रकरणाचे मी साक्षीदार आहे. पाच-दहा वर्षांपूर्वीचे गुन्हे दाखल करून सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. मी पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितले की, मतदानानंतर कारवाई करा, पण त्यांनी ते ऐकले नाही. पोलीस महासंचालकांनाही फोन केला. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे. मंत्र्यांनाही आरोपीप्रमाणे वागवले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली."
फडणवीसांची एन्ट्री, एका वाक्यात विषय संपवला
शिंदे यांनी ही माहिती देत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाले. त्यांनी थेट आपले म्हणणे मांडताना म्हटले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याची चौकशी केली जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल." इतक्या एका वाक्यात त्यांनी विषय संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात चर्चा झाली. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याने मुख्यमंत्री चिडल्याचे समजते.
विधानपरिषदेतही राडा
याआधी विधानपरिषदेत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील घटनेची गंभीर दखल घेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
साताऱ्यात नेमकं काय झालं?
एकूण जागा: ६५, बहुमतासाठी ३३ जागा आवश्यक.
शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडे ३५ जागा असतानाही भाजपने अध्यक्षपद जिंकले.
भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ६ सदस्य फोडले.
पोलिसांनी दोन सदस्यांना मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले तर मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी घेरल्याची घटना घडली.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.