बैरुत: मध्य पूर्वेतील धग आता अधिकच तीव्र झाली असून इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. एका बाजूला क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असताना आणि आसमंतात धुराचे लोट पसरलेले असताना, लेबनॉनची राजधानी बैरुत येथून एका प्रवासी विमानाने घेतलेल्या उड्डाणाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मृत्यूच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांनी केलेले हे धाडसी उड्डाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
भीषण स्फोट अन् विमानाची झेप
मिडल ईस्ट एअरलाइन्सचे हे 'एअरबस' विमान मंगळवारी सकाळी बैरुत विमानतळावरून सायप्रसच्या लार्नाका शहरासाठी झेपावले. ज्यावेळी विमानाने धावपट्टी सोडली, त्याचवेळी विमानतळाच्या जवळ असलेल्या परिसरात इस्रायलकडून जोरदार हवाई हल्ले सुरू होते. आकाशात काळपट धुराचे लोट आणि कानठळ्या बसवणारे स्फोटांचे आवाज येत असतानाही, वैमानिकांनी अतिशय कौशल्याने १६० प्रवाशांसह हे विमान सुरक्षितपणे हवेत झेपावले.
लेबनॉनमध्ये युद्धाचा वणवा
इस्रायलने लेबनॉनमधील हेझबोल्लाहच्या तळांना लक्ष्य केल्यामुळे संपूर्ण देशात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायली सैन्याने सुमारे ५९ भाग तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक नागरिकांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.
सायप्रस ठरतोय 'सुरक्षित दरवाजा'
लेबनॉन सोडून जाणाऱ्या नागरिकांसाठी सायप्रस हा युरोपमध्ये जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग ठरत आहे. बैरुत ते लार्नाका हे अंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांचे असल्याने या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लेबनॉनमधून जाताना ही विमानं तुडुंब भरलेली असतात, मात्र परतीच्या प्रवासात ती जवळपास रिकामीच येत आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.