माण-खटावमध्ये पाणी वाटपावरून ठिणगी; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) सचिन मेनकुदळे
म्हसवड:
माण-खटाव तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आता तीव्र संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाच्या कारभारात 'नियोजित पाणी घोटाळा' आणि 'भेदभाव' होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केला आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास १३ मे रोजी म्हसवड येथे उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख आरोप आणि निवेदनाची पार्श्वभूमी
महेश करचे यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, माण तालुक्याच्या पूर्व भागातील गावांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.
वंचित गावे: वळई, जांभुळणी, गंगोती, पुळकोटी, शिरताव, देवापूर, पळसावडे आणि बनगरवाडी या गावांना अद्याप एकदाही पाण्याचे आवर्तन मिळालेले नाही.
प्रशासकीय भेदभाव: वरच्या भागातील गावांना दोनदा पाणी दिले असताना, पूर्व भागाला डावलणे हा उघड भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली असल्याचे करचे यांनी म्हटले आहे.
पाणी चोरीला संरक्षण: वडजल परिसरात कॅनॉलचे पाणी बेकायदेशीरपणे अडवून वळवले जात असतानाही अधिकारी कारवाई करत नसल्याने, या चोरीला प्रशासनाचे मूक समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"निवडणुका आल्या की पाणी येते आणि निवडणुका संपल्या की पाणी गायब होते. माण-खटावमध्ये पाण्याचे राजकारण करून जनतेला वेठीस धरले जात आहे. जिहे-कटापूर योजनेचे पाणी न सोडल्यामुळे सरकारला टँकरवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे."
— महेश करचे, सामाजिक कार्यकर्ते
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह संबंधित शाखा अभियंत्यांवर खालील कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अन्वये
प्रशासनाने १२ मे २०२६ पर्यंत समन्यायी पाणी वाटप सुरू न केल्यास, उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करून अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा संताप: "आम्हाला दया नको, हक्क हवा"
सौ. स्वाती अण्णासाहेब व्हरकाटे, माजी सरपंच, पळसावडे : “पळसावडे गावाला आजपर्यंत तारळी योजनेचे एकदाही पाणी मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके जळून जात आहेत, जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि गावातील लोक अक्षरशः हतबल झाले आहेत. एकीकडे कॅनॉलमधून पाणी वाहते, पण आमच्या वाट्याला फक्त कोरडी आश्वासने येतात. प्रशासनाने आमच्या गावाला जाणीवपूर्वक वाळीत टाकले असून, हा केवळ अन्याय नाही तर आमच्या अस्तित्वावर घाला आहे.”
योगेश झिमल, शेतकरी, गंगोती : “पाणी येणार या विश्वासावर आम्ही बँकेचे आणि सावकारांचे कर्ज काढून ढोबळी मिरची, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब अशा पिकांमध्ये लाखोंची गुंतवणूक केली. पण आता पाणीच मिळालं नाही तर आमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण पिकं जळून जात आहेत. जनावरांना पाणी नाही, घराघरांत चिंता आणि नैराश्य आहे. अधिकारी फक्त आश्वासनं देतायत; पण शेतकरी रोज आर्थिकदृष्ट्या संपत चाललाय. आम्हाला दया नको, आमच्या हक्काचं पाणी द्या… नाहीतर उद्या शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.