⚡ ब्रेकिंग News

‘तुमची मन की बात खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका’; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र, काय काय म्हणाले?


  काटकसरीच्या आवाहनावर मनसेप्रमुखांचा टोला; ‘चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का?’; ‘रेवडी संस्कृतीची खिल्ली उडवली, पण निवडणुका रेवड्या वाटूनच जिंकलात’; ‘स्वतः परदेश दौऱ्यावर जाता, मग आम्हाला काटकसर सांगता?’; स्वतःपासून काटकसर सुरू करा

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई, १२ मे २०२६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना काटकसरीचे नऊ महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनालाच सडेतोड उत्तर देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 ‘मन की बात खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका’

राज ठाकरे म्हणाले, “तुमची ‘मन की बात’ खूप झाली. आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची ‘मन की बात’ ऐका. तुम्ही व्यवसायही केलेला नाही, तर तुम्हाला अर्थव्यवस्था कशी समजणार?” राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनालाच आव्हान देताना भूतकाळातील घटनांचा दाखला दिला.

ते म्हणाले, “२००८ नंतर २०११-१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळी, २०१३-१४ मध्ये, २०२२-२३ मध्ये खनिज तेलाचा भाव ९०-१०० डॉलर्स होता. या तीन-चार वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांनी असं आवाहन केलं नाही. ज्या वेळी भाजप सत्तेत नव्हता, तेव्हा मोदी यांनी स्वतः हे आवाहन केलं नाही. मग आत्ताच का?”

‘चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का?’

राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटले की, “स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत, त्याचं काय करणार आहात? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही असं काही करणार नाही, असं सांगणार आहात का? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?”

 ‘रेवडी संस्कृतीची खिल्ली उडवली, पण रेवड्या वाटूनच निवडणुका जिंकलात’

राज ठाकरे यांनी ‘रेवडी संस्कृती’च्या मुद्द्यावरही पंतप्रधानांना घेरले. ते म्हणाले, “ज्या रेवडी संस्कृतीची तुम्ही खिल्ली उडवली, त्याच रेवड्या २०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असो, त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणुका असोत की इतर कुठल्याही निवडणुका – रेवड्या वाटूनच निवडणुका जिंकल्यात.”

त्यांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करताना म्हटले, “महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे.”

स्वतः परदेश दौऱ्यावर जाता, मग आम्हाला का सांगता?’

पंतप्रधान मोदी यांच्या आगामी परदेश दौऱ्यांवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत. हे दौरे थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.”

पुढे ते म्हणाले, “लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळी असंच आवाहन केलं होतं, पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का? हे केलंत तर देश पण करेल.”

 ‘पेट्रोल-डिझेलचे दरवाढीचे संकेत?’

राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनामागे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची तयारी असल्याचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “आणि तसाही पर्याय काय आहे? येत्या काळात सरकारला पेट्रोल-डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार, त्याची पूर्वतयारी सुरू आहे. हे भाव वाढले की लोकं अपरिहार्यपणे न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.”

‘स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करा’

राज ठाकरे यांनी आपल्या पत्राच्या शेवटी पंतप्रधानांना सल्ला दिला की, “माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि याचं नुसतं खापर इराण-इस्रायल युद्धावर टाकू नका.”

पुढे ते म्हणाले, “तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचं अवमूल्यन झालं, हे कशामुळे झालं ते सांगा. तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले?”

 ‘प्रश्न विचारणार, पण विरोधक नाही’

राज ठाकरे यांनी हेही स्पष्ट केले की, ते पंतप्रधानांचे विरोधक नसून प्रश्न विचारणार नागरिक आहेत. ते म्हणाले, “तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे. पण आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार.”

त्यांनी पंतप्रधानांना संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन परिस्थितीवर स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली.

 काय होतं पंतप्रधान मोदींचं आवाहन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जनसभेतून देशवासियांना काटकसरीचे सल्ले दिले होते:

 एक वर्ष सोने खरेदी करू नका

 पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा

 वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या

 परदेश प्रवास टाळा

 खाद्यतेलाचा वापर कमी करा

 नैसर्गिक शेतीचा अवलंब करा

 स्वदेशी उत्पादनं वापरा

 मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा

 इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा

 राजकीय वर्तुळात खळबळ

राज ठाकरे यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसे प्रमुखांनी अनेकदा विरोधी भूमिका घेतली असली तरी, पंतप्रधानांना सरळ पत्र लिहून इतक्या स्पष्ट शब्दांत प्रश्न विचारणे ही नवी घटना आहे. पत्रात मांडलेले मुद्दे आणि उपस्थित केलेले प्रश्न हे येत्या काळात राजकीय चर्चेचा विषय ठरतील, यात शंका नाही.

राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमालाही आपल्या पत्रातून प्रतिसाद दिल्याचे दिसते. त्यांनी अर्थतज्ज्ञांचे म्हणणे ऐकण्याचा सल्ला देत खरोखरच अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांच्या या पत्रामुळे पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावरून सुरू झालेला राजकीय वाद अधिक तापला आहे. रोहिणी खडसे, रोहित पवार यांच्यानंतर राज ठाकरे यांनीही हा मुद्दा हाती घेतला आहे. पंतप्रधानांनी आता या प्रश्नांची उत्तरे एकतर संसदेत किंवा इतर माध्यमातून द्यावी लागतील. तसे न केल्यास हे प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करतील. पंतप्रधान मोदी यांचे हे आवाहन लोककल्याणासाठी आहे की सरकारच्या अपयशावरचे पांघरूण, याचा निर्णय आता जनतेलाच करायचा आहे. पण एवढे निश्चित – राज ठाकरेंनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळ नक्कीच देईल. एक प्रश्न मात्र सगळ्यात सामान्य जनत्येच्या मनात आहे – “मग निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी लाखो लिटर पेट्रोल वाया घालवणं काय बरोबर होतं?” या प्रश्नाची उत्तरे राज ठाकरेंपुरती मर्यादित नाही आहेत.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...