दिघंची: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आणि दिघंची (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यमाई देवीच्या यात्रेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. एकेकाळी आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठी जनावरांची आणि शेळ्या मेंढयाची यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेला प्रशासकीय अनास्थेची ग्रहण लागल्याने ती बंद पडली होती. मात्र, ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या पुढाकाराने ही संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.
वैभवाचा इतिहास आणि विस्थापनाचा फटका
रंगपंचमी ते गुढीपाडवा अशा प्रदीर्घ कालावधीत भरणाऱ्या या यात्रेला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विशेषतः खिलार जनावरांच्या बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध होती. परंतु, काळानुरूप वाढती गर्दी आणि जागेची टंचाई यामुळे यात्रेचे मूळ ठिकाण बदलून ती दिघंची-मायणी रोडवरील पटांगणात हलवण्यात आली. या विस्थापनानंतर यात्रेचे स्वरूप बदलत गेले आणि हळूहळू ही मोठी परंपरा लुप्त झाली. काही वर्षे तर ही यात्रा पूर्णपणे बंदावस्थेत होती.
पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांचे पाऊल
गावचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आता देवीचे मानकरी शेटे कुटुंब, पुजारी भांबुरे आणि समस्त दिघंची ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून या परिसरात आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात झाली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे यात्रेला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून अपेक्षा
केवळ जागेअभावी किंवा नियोजनाअभावी ग्रामीण संस्कृतीचा हा ठेवा नष्ट होऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे. जर प्रशासनाने या कालावधीत आवश्यक सोयी-सुविधा, मैदान व्यवस्था आणि वीज-पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला, तर दिघंचीची ही यात्रा पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल.
तसेच आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या यात्रेत लक्ष घालून जनावरांचा बाजार पुन्हा सुरु करणार का?
"आपल्या पूर्वजांनी जपलेली ही संस्कृती येणाऱ्या पिढीला फक्त गोष्टींमधून सांगावी लागू नये, यासाठी ही यात्रा पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यास दिघंचीचे वैभव नक्कीच परत येईल."
— ग्रामस्थ, दिघंची
आता प्रश्न उरतो तो इतकाच की, प्रशासन ग्रामस्थांना सोबत घेऊन या ऐतिहासिक वारशाची दखल घेऊन सहकार्याचा हात पुढे करणार का?

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.